माले – मालदीवने चीनशी संरक्षण कहकार्य करार करण्याचे निश्चित केले आहे. या करारानुसार मालदीवला चीनकडून लष्करी उपकरणे आणि चीनच्या लष्कराकडून प्रशिक्षण मिळणार आहे. मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांनी ही माहिती दिली आहे. या संरक्षण सहकार्यामुळे मालदीवचे स्वातंत्र्य आणि स्वायत्ततेला अधिक समर्थ केले जाऊ शकेल, असे मुइझ्झू म्हणाले.
मुइझ्झू यांनी इंटरनॅशनल मिलिटरी कोऑपरेशन ऑफ चायनाचे उपसंचालक मेजर जनरल झांग बावकन आणि एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ चायनाचे अध्यक्ष रेन शेनग्युइन यांची स्वतंत्रपणे भेट घेतली आहे.
याआधी मालदीवचे संरक्षण मंत्री मोहम्मद घसान मौमून आणि मेजर जनरल झांग यांनी सोमवारी लष्करी सहाय्य करारावर स्वाक्षरी केली आहे, असे मालदीवच्या संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले.
मात्र या कराराचा अधिकचा तपशील जाहीर केला गेला नाही. मालदीवने चीनशी संरक्षण सहकार्य करण्याची ही पहिली वेळ नाही. मालदीवच्या शहरी आणि आर्थिक विकासासाठी मालदीवने यापूर्वी चीनशी करार केला आहे.
कोणत्याही भारतीयांना मालदीवमध्ये स्थान नाही
चीनशी जवळीक करत असतानाच मुइझ्झू यांनी भारतीयांना मालदीवमधून पूर्णपणे बाहेर काढण्याची व्यवस्था केली आहे. भारतीय सुरक्षा दलांपाठोपाठ आता साध्या कपड्यांमधील सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही मालदीवमध्ये रहाता येणार नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय सुरक्षा दलाचे कोणीही कर्मचारी १० मार्चनंतर मालदीवमध्ये राहू शकणार नाहीत, असे त्यांनी ठामपणे सांगितले आहे.