पुणे – लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) दापोडी परिसरातून एका तरुणाला अटक केली. मोहम्मद जुनेद खान (वय , रा. दापोडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. दरम्यान त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील विजय फरगडे यांनी केली.
दहशतवादी कारवाई करणयासाठी त्याला जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांनी पैसे पुरविल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. जुनेद गेल्या काही महिन्यांपासून समाजमाध्यमातून जम्मू काश्मिरमधील दहशतवाद्यांच्या संपर्कात आला होता. याबाबतची माहिती मिळाल्यावर एटीएसच्या पथकाने दापोडीतून त्याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी करण्यात आली. तो दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. जुनेद मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील रहिवाशी असून गेल्या दीड वर्षांपासून पुण्यात राहत होता.