पुणे – रेल्वे स्टेशनवर मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला दहा वर्षे सक्तमजुरी आणि सहा हजार रुपये दंडाची शिक्षा प्रमुख जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख यांनी सुनावली. दंड न भरल्यास त्याला सहा महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
स्वप्निल रविंद्र खोबे (वय 30, रा. चिंचवड) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीने लोहमार्ग पोलिसात फिर्याद दिली आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे ऍड. विलास पटारे यांनी काम पाहिले. महिला पोलीस उपनिरीक्षक एम.एस.कवटीकवार यांनी या प्रकरणाचा तपास केला. न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस निरीक्षक खोपीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक विष्णू साळेकर, पोलीस नाईक दत्तात्रय मोरे आणि निशांत कसबे यांनी मदत केली.
4 जून 2019 रोजी रात्री 2 च्या सुमारास ही घटना घडली. पीडित बिहारची आहे. ती रेल्वे स्टेशनवर झोपली होती. त्यावेळी “तुझा फोन कुठे आहे’ म्हणत त्याने तिला उठविले. फोन मिळून आला नाही. त्याने तिच्या भाभी आणि भावाच्या फोनवर फोन करून तिला घरी घेऊन जातो, आणि चांगले संभाळतो, असे सांगितले. मात्र, भावाने तिला पोलीस स्टेशनला सोडायला सांगितले. मात्र, त्याने रेल्वे यार्डात दोन रेल्वे गाड्यांच्या मध्ये टॉयलेटमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. बलात्काराच्या वेळी ती ओरडायला लागली असता, तिला मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी न्यायालयाने तिला बलात्कार कलमानुसार (भारतीय दंड संहिता कलम 376) 10 वर्षे सक्तमजुरी आणि 5 हजार रुपये दंड आणि मारहाण (कलम 323) नुसार 1 वर्षे कारावास आणि 1 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दोन्ही शिक्षा एकत्रित भोगायच्या आहेत.