सोलापूर – सोलापूर महानगरपालिकेतील सर्वसाधारण, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील महिला आरक्षण सोडत प्रक्रिया 31 मे रोजी होणार आहे. महापालिका आयुक्त पी.शिवशंकर यांनी ही माहिती दिली. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा महिलांसाठी सहा जागा नव्याने वाढणार असून महिला सदस्यांची संख्या 51 वरून 57 वर जाण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण सोडत प्रक्रिया राबविण्यासाठी महापालिका प्रशासनाला निर्देश दिले आहेत. त्यामध्ये आरक्षण सोडत बाबतची रूपरेषा स्पष्ट केली जाणार आहे.
दरम्यान सोलापूर महानगरपालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत सदस्यांची संख्या 102 इतकी होती. चार सदस्यांचा एक प्रभाग होता. प्रत्येक प्रभागांमध्ये दोन महिला व दोन पुरुष अशा पद्धतीने आरक्षण सोडत काढण्यात आली होती. या आरक्षण पद्धतीने 51 महिला तर 51 पुरुष उमेदवारांना संधी देण्यात आली होती. यंदा सदस्य संख्येत 11 ने वाढ झाली आहे.
प्रभाग रचनेत सुद्धा बदल होत तीन सदस्यांचा एक प्रभाग करण्यात आला आहे. महिलांसाठी असलेल्या 50 टक्के आरक्षणानुसार 56 महिला व 56 पुरुष अशा पद्धतीने सदस्यांचे विभाजन होणार आहे .उर्वरित एका जागेसाठी पुन्हा लॉटरी काढून आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे .त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत महिलांसाठी सहा जागा वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. प्रभाग 56 की प्रभाग 57 ची जागा लॉटरीद्वारे निश्चित होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.