बारामती – किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत खरीप पणन हंगाम 2023-2024 मध्ये विकेंद्रीत धान खरेदी योजने अंतर्गत हमीभावाने भरडधान्य (मका) खरेदी साठीची ऑनलाइन नोंदणी दि. 1 ऑक्टोबर पासून सुरू झाली असून दि. 30 नोंव्हेबर 2023 पर्यंतची मुदत आहे. ऑनलाइन नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना मका प्रति क्विंटल 2090 रुपयाने ने खरेदी करणेत येणार आहे.
सध्या मक्याचा हंगाम सुरू झाल्याने बाजारात आवक सुरू झाली आहे. त्यामुळे बारामती मार्केट कमिटीने शासनाकडे हमीभाव खरेदी केंद्राची मागणी केल्याने ते मंजुर झाले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर मुदतीत नाव नोंदणी करून खरेदी केंद्राचा फायदा घ्यावा असे आवाहन बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनिल पवार आणि उपसभापती निलेश लडकत यांनी केले आहे.
मका खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी नाव नोंदणी साठी मका पिकाची नोंद असलेल्या 7/12 उतारा, (पिकपेरा) आधारकार्डची छायांकित प्रत व चालु असलेले बॅंक खाते अचुक तपशिलासह झेरॉक्स, मोबाइल नंबर आदी आवश्यक कागदपत्रे तसेच एका पेक्षा जास्त बॅंक खाते करिता एकाच शेतकऱ्यांची नोंद असू नये. तरी मका उत्पादक शेतकऱ्यांनी नीरा कालवा संघ, तिन हत्ती चौक बारामती येथे प्रथम ऑनलाइन नाव नोंदणी करावी.
खरेदी सुरू झाल्यानंतर नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना नोंदणीच्या क्रमवारीनुसार मका खरेदी केंद्रावर आणण्यासाठीनंबर नुसार एसएमएसद्वारे कळविण्यात येईल. त्यानुसार शेतकऱ्यांनी बारामती बाजार समितीचे यांत्रिक चाळणी येथील खरेदी केंद्रावर मका स्वच्छ व वाळवून आणावा, असे आवाहन बाजार समिती तर्फे करण्यात येत आहे.
मक्याचा हमीभाव दर प्रति क्विंटल 2090 रुपये आहे. ज्या शेतकऱ्यांची नाव नोंदणी होईल त्यांच शेतकऱ्यांची मका खरेदी करणार असलेने शेतकऱ्यांना नोंदणी बंधनकारक आहे, अशी माहिती सचिव अरविंद जगताप यांनी दिली.