बचत गटाच्या नावाखाली 16.50 लाखाची ‘फसवणुक’; दोन महिलांना ‘पोलीस कोठडी’

पुणे – महिला बचत गटाच्या नावे 48 महिलांकडून दरमहा 1 हजार रुपये स्विकारून 16 लाख 56 हजार रुपयांची दोन महिलांनी फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. पौड पोलिसांनी त्या दोघींना अटक केली असून, न्यायालयाने 8 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. मुळशी तालुक्‍यातील माले येथे 25 जानेवारी 2017 ते 15 ऑगस्ट 2020 या कालावधीत हा प्रकार घडला.

सविता भोलेनाथ घाग (वय 43) आणि स्वाती शिवाजी कदम (वय 35, दोघीही, रा. माले, ता. मुळशी) अशी त्या दोघांची नावे आहेत. याबाबत अर्चना चंद्रकांत शेंडे (वय 35) यांनी पौंड पोलिसात फिर्याद दिली आहे. सविता आणि स्वाती या दोघींनी माले येथील 48 महिला गोळा करून 50 महिलांचा सियाराम महा महिला बचत गट चालू केला.

दोघींनी प्रत्येक महिलेकडून दरमहा 1 हजार रुपये स्विकारले. बॅंकेमध्ये खाते उघडून हे पैसे भरणे आवश्‍यक होते. मात्र, त्यांनी बॅंकेत खातेच उघडले नाही. या पैशाचा अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी दोघींना अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी गुन्ह्यातील रक्कमेचा तपास करण्यासाठी दोघींना पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील नीलेश लडकत यांनी केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.