करोनावर मात करून जनसेवेसाठी ‘ते’ पुन्हा रस्त्यावर !

  • नगरसेवक मारुती तुपे यांची करोनावर यशस्वी मात
  • सुमारे तेवीस दिवस खासगी रुग्णालयात सुरू होते उपचार

हडपसर –  करोना काळात मार्चच्या  मध्यापासून ते अगदी काल-परवापर्यंत प्रभागातील नागरिकांसाठी अहोरात्र झटणारे भाजपचे नगरसेवक मारुती तुपे यांना अखेर  करोनाने गाठलेच, परंतु करोनावर मात करत तुपे आता घरी परतले असून प्रभागात सोमवारी मध्यरात्री सुरू असलेल्या रस्त्याच्या डांबरीकरण कामाची पाहणी करून ते पुन्हा एकदा जनसेवेत सक्रिय झाल्याचे पहायला मिळाले .

 

 

नगरसेवक मारुती तुपे हे २८ डिसेंबरला येथील एका खासगी रूग्णालयातून घरी परतले आहेत .५ डिसेंबर रोजी त्यांना करोनामुळे येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. १७ दिवस अतिदक्षता विभागात तर ६ दिवस जनरल वॉर्डमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले. बरे वाटू लागल्याने ते रूग्णालयातून घरी परतले पुढे थोडा आराम करून पुन्हा एकदा जनतेच्या सेवेसाठी तत्पर रहात त्यांनी प्रभागात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामवर स्वतः उपस्थित राहून काम करून घेतले.

 

 

मार्चच्या मध्यापासून  करोनाचा उद्रेक झाल्यानंतर नगरसेवक मारुती तुपे यांनी एकही दिवस आपला प्रभाग सोडला  नाही. जनतेला भाज्या उपलब्ध करून देणे, कोरोना होवू नये म्हणून रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी गोळ्यांचे वाटप करणे, मॉस्कचे वाटप करणे, विभागातील जनतेसाठी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये तसेच रस्त्यावर जंतुनाशक फवारणी करून घेणे, डासांचा उद्रेक होवू नये यासाठी धुरीकरण मोहीम स्वखर्चाने राबविणे, गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारात कोरोना चाचणी , रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे, अन्नदान, परप्रांतियांना सर्व मदत, गरजूंना किराणा साहित्य  उपलब्ध करून दिले.

 

 

याशिवाय प्रभागात कोणाला  करोना  झाल्यास त्यास रूग्णालयात ऍडमिशन  करून देणे, आयसीयू बेडस, व्हेंन्टिलेटर, ऑक्सिजन उपलब्ध करून देणे, कोरोना  रूग्णाला उपचारादरम्यान रूग्णालयात कोव्हिड सेंटरमध्ये काही त्रास तर होत  नाही ना, याची सतत  खातरजमा करून घेणे, कोरोना रूग्णाच्या परिवाराची  काळजी घेणे आदी कामात नगरसेवक तुपे यांनी स्वत:ला अक्षरश झोकून दिले होते. मार्च ते नोव्हेंबर या सात महिन्याच्या कालावधीत करोना महामारीमध्ये स्वत:च्या जिविताची काळजी न घेता नागरिकांसाठी झटताना तुपे यांना अनेकांनी जवळून पाहिले आणि अनुभवलेही.

 

मात्र,  करोनाविरोधात कार्य करताना, जनसेवा करताना नगरसेवक तुपे यांना कोरोनाने गाठले. आपल्यामुळे इतरांना त्रास होवू नये, कोणाला कोरोनाची लागण होवू नये म्हणून होम क्वारन्टाईन न होता त्यांनी  रूग्णालय गाठले. तेथे असले तरी फोनवरून जनसेवा करण्यात खंड  काही पडला नव्हता. असे कार्यकर्त्यांनी सांगितले. करोनावर यशस्वीपणे मात करून ते  आता घरी परतले असून पुन्हा  जोमाने जनसेवेला सुरूवात केली आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.