आ. शशिकांत शिंदे यांचा निसटता पराभव; एका “शिंदेशाही’चा अस्त, “दुसरी’चा उदय
कोरेगाव – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मातब्बर नेते, माजी जलसंपदा मंत्री व विद्यमान आमदार शशिकांत शिंदे यांचा कोरेगाव विधानसभा मतदारसंघात तुलनेने नवख्या असलेल्या शिवसेना-भाजप व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार महेश शिंदे यांनी अत्यंत चुरशीच्या लढतीत पराभव केल्याने जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली आहे. या अत्यंत प्रतिष्ठेच्या लढतीत शिवसेनेचे युवा नेते महेश शिंदे यांनी 6232 मतांनी धक्कादायक विजय मिळवला. त्यामुळे महेश शिंदे हे “जायंट किलर’ ठरले असून तालुक्यात एका “शिंदेशाही”चा अस्त तर दुसऱ्या “शिंदेशाही’चा उदय झाला आहे.
कोरेगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीने विद्यमान आमदार शशिकांत शिंदे यांना पुन्हा उमेदवारी दिली. 2014 च्या निवडणुकीनंतर या मतदारसंघात गेली पाच वर्षे भाजपमधून काम करणाऱ्या आणि 2019 च्या निवडणुकीची तयारी करणाऱ्या महेश शिंदे यांना ऐनवेळी शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी करावी लागली. महायुतीच्या जागावाटपात 2014 चा अपवाद वगळता कोरेगाव मतदारसंघ पारंपरिकदृष्ट्या शिवसेनेकडे होता. भाजप, शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस या चारही प्रमुख पक्षांनी 2014 ची विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवली होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना व मित्रपक्षांची पुन्हा महायुती झाली तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी व मित्रपक्षांनी पुन्हा महाआघाडी केली. त्यानंतर महायुतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ पुन्हा शिवसेनेच्या वाट्याला आला.
मात्र, आ. शशिकांत शिंदे यांना लढत देऊ शकेल, असा तुल्यबळ उमेदवार शिवसेनेकडे नसल्याने त्यांनी भाजपकडून महेश शिंदे यांना आयात करून उमेदवारीही दिली. त्यामुळे या दोघांमध्ये चुरशीची लढत होणार, हे तेव्हाच स्पष्ट झाले होते. हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडून खेचून घ्यायचाच, या निर्धाराने महेश शिंदे यांनी निवडणुकीत मोर्चेबांधणी केली. त्यांनी कार्यकर्त्यांचे मोहोळ आपल्याभोवती जमवले होते. त्यातच आ. शशिकांत शिंदे हे “उपरे’ असल्याच्या कोरेगावकरांच्या भावनेचा फायदा उचलण्याचा प्रयत्नही शिंदे यांनी केला. या भावनेला हळुवारपणे फुंकर घालत महेश शिंदे यांनी आ. शशिकांत शिंदे यांच्याविरोधात रान पेटवले. मात्र, शशिकांत शिंदे हेदेखील काही कच्च्या गुरूचे चेले नाहीत. त्यांनीही आपल्या विकासकामांच्या जोरावर मतदारांना कौल मागितला.
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या या मतदारसंघात 68 टक्के एवढे विक्रमी मतदान झाल्याने निकालाची उत्कंठा ताणली गेली होती. सातारा येथील नवीन एमआयडीसीत वखार महामंडळाच्या गोदामात आज सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू झाल्यापासून दोघांमध्ये अटीतटीची झुंज झाली. मतमोजणीच्या 21 फेऱ्यांमध्ये आ. शशिकांत शिंदे यांनी आघाडी घेतली होती. त्यानंतरच्या फेऱ्यांमध्ये महेश शिंदे यांनी मुसंडी मारत आघाडी घेतली. ही आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवत त्यांनी 6299 मतांनी विजयश्री मिळवली. महेश शिंदे यांना एक लाख एक हजार 487 तर आ. शशिकांत शिंदे यांना 95 हजार 255 मते मिळाली.
गेली दहा वर्षे विधानसभेत कोरेगाव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि पक्षप्रतोद असलेल्या आ. शशिकांत शिंदे यांना महेश शिंदे या नवख्या उमेदवाराकडून पराभव पत्करावा लागल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. आ. शिंदे यांचा पराभव केवळ त्यांच्यासाठी नव्हे तर राष्ट्रवादी कॉंग्रेससाठीही धक्कादायक ठरला आहे. त्यामुळे शशिकांत शिंदे यांची राजकीय कारकीर्द पणाला लागली असून भविष्यात ते कोरेगाव मतदारसंघातच कार्यरत राहणार की, पूर्वीच्या जावळी मतदारसंघाकडे म्हणजेच पुनर्रचनेनंतर निर्माण झालेल्या सातारा-जावळी मतदारसंघाकडे आपला मोर्चा वळवणार, हे येणारा काळच ठरवणार आहे. मात्र, गेल्या 50 वर्षांत कोरेगाव विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेस व राष्ट्रवादी सोडून इतर पक्षांचा आमदार कधी निवडून आला नव्हता. ही किमया महेश शिंदे यांनी या ऐतिहासिक विजयाने साधली आहे. कोरेगाव मतदारसंघातील शिवसैनिक व भाजप कार्यकर्त्यांनी महेश शिंदे यांचे जल्लोषी वातावरणात स्वागत केले.