इंदापूरच्या गडावर राष्ट्रवादीची टिक्‌टिक्‌ कायम

भरणेंना विकासकामे, जनसंपर्काने तारले : मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन झिडकारले

रेडा – पुणे जिल्ह्यातील इंदापूर विधानसभेची निवडणूक भाजपविरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस अशी रंगली होती. परंतु भाजपचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांनी दारूण पराभव करीत पुन्हा राष्ट्रवादीचा दरारा इंदापूर तालुक्‍यात निर्माण केला आहे.

2014 मध्ये पाटील यांचा इंदापूर विधानसभेला राष्ट्रवादीचे भरणे यांनी पराभव करून पाटील यांना घरचा रस्ता दाखवला होता. तेव्हापासून पाटील यांनी इंदापूर विधानसभा जिंकायची, या ईर्षेने जुन्या, नव्या कार्यकर्त्यांना एकत्र करीत पाच वर्षे गावे वाड्या-वस्त्या पिंजून काढल्या. लोकोपयोगी कामे करीत संपर्क ठेवला होता. त्यातच कॉंग्रेसच्या पहिल्या फळीतील नेते म्हणून पाटलांकडे राज्यामध्ये पाहिले जात होते. मात्र, काही महिन्यांपूर्वी पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करीत थेट कमळ हाती घेतले. त्यामुळे त्यांना भाजपने उमेदवारी दिली. विधानसभेला आपला विजय निश्‍चित आहे, असा त्यांना विश्‍वास होता. परंतु आमदार भरणे यांनी विकासाच्या जोरावर पाटील यांना चित्रपट करत दुसऱ्यांदा विजय संपादन केला आहे.

प्रचारात मुख्यमंत्री, जलसंपदामंत्री, केंद्रीय मंत्री व विद्यमान खासदार अशा वजनदार नेत्यांच्या सभा इंदापूरच्या मैदानात गाजल्या. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढची इंदापूरची जबाबदारी मी घेतोय. इंदापूरचा प्रश्‍न मी सोडणार आहे, अशी आश्‍वासने होती. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी इंदापूर तालुका पाण्यासाठी दत्तक घेतल्याचे जाहीर केले होते. तरीही मतदारांनी भूलथापांना बळी न पडता राष्ट्रवादीचे आमदार भरणे यांनी चौदाशे कोटी रुपयांच्या केलेल्या विकासाला प्राधान्य देत भाजपची मतपेटीतून मुस्कटदाबी केली.

राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूरचा गड पुन्हा राष्ट्रवादीकडे खेचून घ्यायचा, यासाठी मेहनत घेतली. शरद पवार यांनी जर कोणी राष्ट्रवादीच्या मतदारांवर दबाव व धमकावण्याचा प्रयत्न केला तर सोडणार नाही, असा गर्भित इशारा देत चक्‍क पाय मोडण्याची भाषा केली होती. त्यामुळे राष्ट्रवादीमधून भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेल्या नेत्यांची पाचावर धारण बसली होती. यापैकी काही नेत्यांनी भाजप उमेदवाराच्या सभेतच घड्याळाला मतदान करा, असे उद्‌गार काढले होते. त्यामुळे आमदार भरणे यांच्या विजयाला झालर शरद पवार यांच्या झालेल्या एका सभेमुळे लावण्यात यश आले आहे.

इंदापूरमध्ये सात जिल्हा परिषदेचे गट आहेत. यामध्ये दोनच गटात पाटील यांना आघाडी मिळाली. परंतु पाच गटांमध्ये आमदार भरणे यांना मताधिक्‍य मिळाल्यामुळे अगदी सहजासहजी आमदार भरणे यांना विजय
मिळवता आला.

इंदापूर तालुका गुलालाने माखला –  
इंदापूर विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात सकाळी आठपासून करण्यात आली. अगदी पहिल्या फेरीपासून राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे हे लीडवर असल्याने इंदापूर शहरात प्रत्येक मतमोजणीच्या फेरीला तोफांची सलामी इंदापूरकर देत होते. भरणे यांचे मताधिक्‍य वाढत असल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरताच तालुक्‍यातील हजारो नागरिकांनी इंदापूर शहरात तोबा गर्दी केली. गुलालाची उधळण सुरू झाली. शहरासह गावागावात कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण केली.

हर्षवर्धन पाटलांची कारकीर्द संपुष्टात – मागील पाच वर्षे वगळता वीस वर्ष इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे व कायम मंत्रिपदाच्या खुर्ची विराजमान असलेले पाटील यांना सलग दुसऱ्यांदा पराभवाचा धक्‍का देऊन राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे हे जॉईंट किलर ठरले आहेत. खऱ्या अर्थाने इंदापूर मतदारसंघात पाटील यांचा पराभव करण्याचा भरणे यांचा पहिला प्रयत्न 2009 मध्ये अपयशी ठरला होता. परंतु सामान्य जनतेच्या हाकेला धावून भरणे यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकासाचा डोंगर तालुक्‍यात उभा केला.

2014 मध्ये पाटील यांना पराभूत केले. परंतु पाटील पाच वर्ष हा पराभव नसून तो अपघात आहे. तालुक्‍याचे लोकप्रतिनिधी निष्क्रिय आहेत, असे आरोप करीत भरणे यांना घरी बसवण्यासाठी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये गेले. तरीदेखील पाटील यांना यश पदरात पडता आले नाही. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दोन सहकारी साखर कारखाने,एक सहकारी बॅंक, पंचायत समिती असतानाही केवळ विकासकामे व सामान्य मतदारांच्या जोरात पाटील यांची कारकीर्द भरणे यांनी संपुष्टात आणली आहे.

काका – पुतण्यांना फक्त चार टर्म

माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे काका कर्मयोगी शंकरराव बाजीराव पाटील हे 1962 ते 1978 पर्यंत चारवेळा कॉंग्रेसच्या तिकिटावर आमदार म्हणून इंदापूर मतदारसंघातून निवडून आले. मात्र चार टर्म झाल्यानंतर त्यांना थांबावेच लागले होते. माजी मंत्री पाटील हे सुद्धा 1995 ते 2009 असे चार टर्म आमदार म्हणून राहिले. 2014 मध्ये पराभूत झाले. आता 2019 मध्ये पाटील यांना पुन्हा पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे अवघ्या चार टर्मवरच काका- पुतण्यांना आमदार म्हणून राहत आले. तसेच थांबावेही लागले, हा योगायोग ठरला आहे. याचीच चर्चा तालुक्‍यात सुरू होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.