साडेपाच हजार मतांनी कांबळे यांचा विजय
पुणे – मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच चुरशीच्या ठरलेल्या कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुनील कांबळे यांनी विजय मिळविला. कांबळे यांनी महाआघाडीचे उमेदवार रमेश बागवे यांचा 5 हजार 12 मतांनी पराभव केला. मात्र, कांबळे यांना हा विजय मिळविण्यासाठी अखेरच्या फेरीपर्यंत झगडावे लागले.
तेराव्या फेरीनंतर कांबळे यांनी निर्णायक आघाडी घेतली. अखेर सुनील कांबळे शेवटच्या फेरीतही मताधिक्य मिळवत 5 हजार 12 मतांनी आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या मतदारसंघात भाजपकडून 2014 मध्ये सुनील कांबळे यांचे बंधू दिलीप कांबळे निवडून आले होते. त्यांनी कॉंग्रेसचे उमेदवार रमेश बागवे यांचा 14 हजार 955 मतांनी पराभव केला.
फेरीनिहाय वाढली चुरस
22 फेऱ्यांमध्ये झालेल्या या मतमोजणीत 14 व्या फेरीनंतर कांबळे यांना निर्णायक आघाडी मिळाली. तर वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमच्या उमेदवारांनीही चांगली चुरस निर्माण केली. पंधराव्या फेरीनंतर नंतर सुनील कांबळे यांना 52,160 मते तर, बागवे यांना 47,160 मते मिळाली. तसेच, वंचितच्या लक्ष्मण आरडे यांना 10,026 तर, एमआयएमच्या हिना मोमीन यांना 6142 मते मिळाली. पहिल्याच फेरीत कांबळे यांना 300 मतांचे मताधिक्य मिळाल्यानंतर दुसऱ्या फेरीत बागवे यांना मताधिक्य मिळाले, त्यानंतर जवळपास 12 व्या फेरीपर्यंत कधी कांबळे तर, कधी बागवे आघाडीवर होते.
एमआयएम, वंचितचा कॉंग्रेसला फटका
कॉस्मोपॉलीटीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमच्या उमेदवारांनीही लक्षणीय मते घेतली. 6 महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात वंचित आणि एमआयएमच्या उमेदवारास चांगली मते मिळाली होती. त्यामुळे भाजपचे खासदारकीचे उमेदवार गिरीश बापट यांचे मताधिक्य घटले होते. त्यामुळे या दोन्ही पक्षांना विधानसभेला चांगली मते मिळतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. तो खरा ठरला.
दोनवेळा मतमोजणी थांबली
मतमोजणी दोनवेळा थांबविण्यात आली. मतमोजणी सुरू झाल्यानंतर दुसऱ्याच फेरीच्या वेळी 14 क्रमांक टेबलवरील मशीन मतदानानंतर चालूच असल्याचे समोर आले. त्यावर कॉंग्रेसने आक्षेप घेतला. त्यामुळे जवळपास दीडतास मतमोजणी थांबली होती. त्यानंतर 14 व्या फेरीच्या वेळीही एक मशीन सील केले नसल्याचे समोर आले. त्यामुळेही सुमारे अर्धातास मतमोजणी थांबविण्यात आली होती. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या मशीनवरील मोजणी शेवट करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सायंकाळी उशिरापर्यंत अंतिम निकाल जाहीर करण्यात आलेला नव्हता.
जिल्हाधिकारी राहिले थांबून
ईव्हीएम क्लोज न केल्याने काऊंटर नंबर 12 येथे मतमोजणीच्या वेळी मशीनने एरर दाखवले. यामुळे उपस्थित प्रतिनिधींनी आक्षेप घेतला. सरतेशेवटी जिल्हाधिकारी तेथे दाखल झाल्यावर या मशीनची मतमोजणी शेवटी घेण्याच्या ठरवण्यात आले. त्यानुसार कॅन्टोमेंट मतदारसंघाचा निकाल लागेपर्यंत तसेच व्हीव्हीपॅट मतमोजणी होईपर्यंत जिल्हाधिकारी नवलकिशोर राम तेथे थांबून होते.