मुंबई – महेंद्रसिंह धोनी व रोहित शर्मा नेतृत्व करताना अत्यंत संयमी वाटतात, तर विराट कोहली आक्रमक असला तरीही सुपर ह्युमनच वाटतो, अशा शब्दात ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू शेन वॉटसन याने हे तीनही खेळाडू कर्णधार म्हणून कसे आहेत याचे समीक्षण केले आहे.
रोहित हा एक सहज व सोपा वाटेल असा कर्णधार आहे. मी त्याला मुंबई इंडियन्सकडून खेळताना जवळून पाहिले आहे. दबावाखाली तो अविश्वसनीय काम करतो. मला रोहितची फलंदाजी बघायला आवडते, तो फलंदाजी करताना खूप प्रेक्षणीय दिसतो, असे वॉटसनने म्हटले आहे.
कोहलीने एक नेता म्हणून अविश्वसनीय गोष्टी करणारा प्रयोगशील कर्णधार होता. त्याने कर्णधार म्हणून असणाऱ्या मर्यादा संपुष्टात आणल्या व आपल्या मतावर ठाम राहणे कसे असते ते दाखवून दिले. तो मैदानावर आक्रमक वाटतो, पण तो सुपर ह्युमन आहे. तो प्रत्येक सामन्यात विशेष ऊर्जा घेऊन येतो. क्रिकेटच्या बाहेरही तो संतुलित व्यक्ती आहे. त्याच्यासोबत रॉयल चॅलेंजर बेंगळुरूकडून खेळणे खूप चांगला अनुभव होता, असेही त्याने सांगितले.
महेंद्रसिंह धोनीला तर कॅप्टन कुल असेच संबोधले जाते त्यामुळे आणखी काय बोलायचे. तो मैदानावर असताना त्याच्या नसांमधून बर्फ वाहतो असेच वाटते. दबावाला तो खूप चांगल्यारितीने हाताळतो. जरी गोष्टी त्याच्या योजनेनुसार होत नसल्या तरीही तो शांत असतो. तो सर्व खेळाडूंवर विश्वास ठेवतो आणि सर्वांचा आत्मविश्वासही वाढवतो, असेही वॉटसनने म्हटले आहे.