कराडला उद्या महाजनादेश यात्रेची जिल्ह्यातील सांगता सभा

कराड – भारतीय जनता पार्टीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिग्गज मंत्री महोदयांसमवेत महाजनादेश यात्रेचे रविवार, दि. 15 रोजी सातारा जिल्ह्यात आगमन होत असून शिरवळ येथे रविवारी दुपारी 1 वाजता महाजनादेश यात्रेचे स्वागत होणार आहे. तर कराड येथील शिवाजी स्टेडियमवर दुपारी 4 वाजता भव्य सांगता सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ना. अतुल भोसले व जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

येथील शासकिय विश्रामगृहात आयोजीत पत्रकार परिषदेस भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांची उपस्थिती होती. महाजनादेश यात्रेची रुपरेषा सांगताना विक्रम पावसकर म्हणाले, या यात्रेचे सातारा जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर दुपारी 3.30 वाजता वाई स्वागत सभा होणार आहे. त्यानंतर ही यात्रा कराड उत्तरमध्ये प्रवेश करणार असून नागठाणे, उंब्रजमार्गे मसूर येथे यात्रेचे स्वागत केले जाणार आहे. तर कराड येथील कृष्णा कॅनॉल येथे राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष ना. शेखर चरेगावकर, ना. डॉ. अतुल भोसले भाजपाच्या सर्व नेते व पदाधिकाऱ्यांकडून या यात्रेचे स्वागत करण्यात येणार आहे. दुपारी 6 वाजता छत्रपती स्टेडियमवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य सभा होणार आहे.

या सभेस सुमारे 30 हजार पेक्षा जास्त लोकांची उपस्थिती असणार असून ही सभा पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी सभा होणार असल्याचा विश्वासही पावसकर यांनी यावेळी व्यक्त केला.
ना. अतुल भोसले म्हणाले, कराडला यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचा मोठा वसा व वारसा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कराडला सर्वच बाबतीत नेहमीच झुकते माप दिले आहे. त्यामुळे येथे भाजपला मोठी ताकद मिळाली असून कराडमध्ये होणारी ही महाजनादेश यात्रा पक्षाच्या भविष्यातील वाटचालीची मुहूर्तमेढ रोवणारी ठरणार आहे.

राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादीतून भाजपमध्ये येणाऱ्यांची अक्षरशः मोठी आहे. तीच परिस्थिती जिल्ह्यातही असून खा. उदयनराजे भोसले भाजपात येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे. त्याचबरोबर उत्तरेसह कराड दक्षिण मतदार संघातही या दोन पक्षांमधून भाजपात येणाऱ्यांची मोठी लाट निर्माण झाली आहे. सोमवारी सकाळी यात्रेचे सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरकडे प्रस्थान होणार आहे.

भाजपात प्रवेश करणारांची मोठी यादी
सर्व भाजपाचे वारे वाहू लागले असून पक्षात येण्यासाठी इच्छुकांची भली मोठी यादी तयार झालेली असून लवकरच मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सर्व इच्छुकांचा भाजप प्रवेश होणार आहे. त्यांना मुंबई येथे पक्ष प्रवेशासाठी घेऊन जाण्यास किमान चार ते पाच ट्रॅव्हल्स लागतील. एवढी त्यांची संख्या मोठी असल्याचे सूचक वक्तव्य डॉ. भोसले यांनी यावेळी केले.

महाजनादेश यात्रेत पक्ष प्रवेश नाही
कराड उत्तर व दक्षिण मतदार संघातून पक्षात येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तालुक्‍यातील मोठे नेते पक्ष प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. मात्र महाजनादेश यात्रेत कोणाचाही पक्ष प्रवेश होणार नाही. पक्ष प्रवेशासाठी विशेष दिवस दिला जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)