रेडा -सध्या जगभरात करोना या दुर्धर आजारापासून सुरक्षित राहण्यासाठी लॉकडाऊन ग्रामीण भागातही सुरू आहे, असे असतानाही शेतीबरोबरच हक्काच्या दूध धंद्यातून चार पैसे मिळतील या आशेवर शेतकरी आहे. मात्र दूध उत्पादकांना नगण्य किमतीने म्हणजेच 22 रुपये लिटरने दूध विकावे लागते आहे. 21 मार्च च्या अगोदर तब्बल लिटरला 31 रुपये दर होता, मात्र तो दर दहा रुपयांनी सध्या कमी झाला आहे. त्यामुळे सध्या तालुक्यातील दूध उत्पादकांची दैना झाल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे.
शेतात काम करायला मजूर मिळत नाही. अशातच कावळा बसायला आणि फांदी मोडायला गाठ पडली असे चित्र दूध उत्पादकांच्या नशिबी आले आहे. त्यामुळे दूध उत्पादकांची अवस्था अत्यंत बिकट बनली आहे. शासनाने जाहीर केलेल्या दूध दारातून आणि शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मिळत असलेल्या दूध दरातून उत्पादन खर्च देखील निघत नाही. जवळपास 140 गावांमध्ये दूध व्यवसाय शेतकरी करतो आहे. मात्र अत्यंत कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागत आहे.