पुणे – कल्याणीनगर अपघाताच्या अनुषंगाने आक्षेपार्ह व अश्लील वक्तव्ये असलेली रील (चित्रफित) इन्स्टाग्राम या समाजमाध्यमावर प्रसारीत केल्याबाबत सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा रील तयार करणारा आणि प्रसारीत करणारा अशा दोघांवर दाखल झाला आहे. या गुन्ह्यास माहिती तंत्रज्ञान कायद्याचे कलम लावण्यात आले आहे.
याप्रकरणी महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहल अडसूळे यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे, की इन्स्टाग्राम अकाउंट सर्फिंग करत असताना त्यांना एका इन्स्टाग्राम अकाउंटवर कल्याणीनगर येथील झालेल्या अपघाताच्या अनुषंगाने एक रील दिसले. यामध्ये समाजातील स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल, असे व नीतीभ्रष्ट करणारी अश्लील वक्तव्ये असलेली पोस्ट दिसून आली. त्यामुळे रील तयार करणारे व इन्स्टाग्राम अकाउंटवर प्रसारीत करणाऱ्या अकाउंटधारकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
या गुन्ह्याचा तपास हा वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे करत आहेत. संबंधित इन्स्टाग्राम कंपनीस दोन्ही इन्स्टाग्राम अकाउंटची युआरएल, तसेच वादग्रस्त सीलची युआरएल पाठवून सविस्तर माहिती मागविण्यात आली आहे. माहिती प्राप्त होताच तिचे तांत्रिक विश्लेषण करून गुन्ह्यातील मूळ आरोपीतांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे पोलिसांनी सांगितले.
सायबर पोलिसांचे आवाहन
समाजमाध्यमात बनावट रील प्रसारित करणे कायद्याने गुन्हा आहे. अशा प्रकारच्या चित्रफितीमुळे समाजात तेढ निर्माण होते. नागरिकांनी अशा प्रकारच्या चित्रफिती प्रसारित करू नये, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.