पुणे – नोंदणी न करताच रस्त्यावर वाहने चालविणाऱ्यांवर पुणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) करडी नजर ठेवली जात आहे. त्यासाठी विविध पथके तैनात करण्यात आली आहेत. कल्याणीनगर येथील अपघाताच्या घटनेनंतर पथकाने सुरू केलेल्या मोहिमेत आतापर्यंत विना नोंदणी केलेल्या तीन दुचाकी आढळून आल्या आहेत.
कल्याणीनगर परिसरात घडलेल्या अपघातातील पोर्शे कारची नोंदणी झालेली नसल्याचे निदर्शनास आले. या कारची बंगळुर येथील वाहन विक्रेत्यांकडून तात्पुरती नोंदणी करून पुण्यात आणली होती. मात्र, ती कार रस्त्यावर आणण्यास परवानगी नव्हती. तरीही ती रस्त्यावर आणून तिने अपघात केला. त्यानंतर पुणे आरटीओने शहरात विना नोंदणी रस्त्यावर आलेल्या वाहनांची शोध मोहीम सुरू केली आहे.
आरटीओच्या वायुवेग पथकांनी केलेल्या तपासणीमध्ये शहरात विना नोंदणी न करता रस्त्यावर आणलेली तीन वाहने आढळून आली आहेत. तीन ही दुचाकी असून त्या कोणत्या वाहन विक्रेत्यांकडून देण्यात आल्या आहेत. याची माहिती घेण्यात येत आहे. त्यापैकी एक दुचाकी फलटण येथून आल्याचे समजले आहे. इतर दोन दुचाकींच्या वाहन विक्रेत्यांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. या वाहन विक्रेत्यांना नोटीस बजावण्यात येणार आहेत, अशी माहिती आरटीओच्या अधिकाऱ्यांनी दिली.