पुणे – महापालिकेच्या अनधिकृत बांधकामावरील कारवाईनंतरही पुन्हा पुन्हा बांधकाम करून अनधिकृतपणे सुरू असलेल्या ९ हाॅटेलवर महापालिकेकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तसेच आणखी २ हॉटेलविरोधात पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. बांधकाम कार्यकारी अधीक्षक अभियंता राजेश बनकर यांनी ही माहिती दिली.
याशिवाय शनिवारी बांधकाम विभागाकडून बाणेर परिसरातील रूफ टॉप हॉटेल, पत्राशेड व अनधिकृत बांधकामांवर कारवाई करत सुमारे ११९२५ चौरस फूट बांधकाम काढण्यात आले. यात हॉटेल इमेज रेस्टोबार, आइस अँड फायर बाणेर हायवेलगत आणि हॉटेल हाईव्ह यांच्या बांधकामाचा समावेश होता.
बांधकाम विभागाचे अधीक्षक श्रीधर येवलेकर, कार्यकारी अभियंता जयवंत पवार, उपअभियंता प्रकाश पवार, कनिष्ठ अभियंता अजित सणस, संदीप चाबुकस्वार, केतन जाधव यांच्या पथकाने एक जेसीबी, दोन गॅस कटर, एक ब्रेकर, दहा अतिक्रमण कर्मचाऱ्यांच्या साह्याने मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली.