राहुरी | सटाणा ते नगर या दरम्यान बसमधून प्रवास करत असलेल्या एका महिलेच्या बॅगमधील दीड तोळा सोन्याचे गंठण व रोख रक्कम तीन महिलांनी चोरुन नेल्याची घटना दि. २३ मे रोजी दुपारच्या दरम्यान घडली.
रुपाली जांभेकर व त्यांचे पती विशाल जांभेकर हे नगर येथे येण्यासाठी सकाळी सटाणा येथून एसटी बसमध्ये बसले होते. बस राहाता बस स्थानकावर आली असता तेथे तीन अज्ञात महिला बसमध्ये रुपाली जांभेकर यांच्या शेजारी बसल्या. त्या तीन महिलांनी गर्दीचा फायदा घेऊन रुपाली जांभेकर यांच्या बॅगमधील दीड तोळा वजनाचे सोन्याचे गंठण व काही रोख रक्कम चोरुन घेतली. या महिला नगर येथील तिकीट काढून राहुरी फॅक्टरी बस स्थानकावर बसमधून उतरल्या. तेव्हा बसचालक व वाहकाला संशय आल्याने त्यांनी बसमधील इतर प्रवाशांना आपआपले सामान तपासून घेण्यास सांगीतले. मात्र कोणत्याही प्रवाशाने तक्रार केली नाही.
त्यामुळे बस वाहकाने त्या महिलांना जाऊ दिले. बस राहुरी बसस्थानक येथे आली. तेव्हा रुपाली जांभेकर यांच्या बॅगमधील सोन्याचे गंठण चोरी गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. बस चालकाने एसटी बस राहुरी पोलीस ठाण्यात आणली. मात्र भामट्या महिला राहुरी फॅक्टरी येथेच उतरून पसार झाल्या होत्या.