पुणे – प्रतिकारशक्ती वाढावी, आरोग्य चांगले राहावे यासाठी लहान वयातच दिल्या जाणाऱ्या ‘बीसीजी’ अर्थात ‘बॅसिलस कॅल्मेट ग्युरिअन’ लसीचा प्रयोग करोनाबाधितांवर करण्यासाठी हाफकिन संस्थेने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी बी. जे. मेडिकल कॉलेज व ससून रुग्णालयातील बाधितांवर या प्रयोगाला सुरुवात झाली आहे. मध्यम स्वरुपाची लक्षणे असलेल्या 60 रुग्णांची यासाठी निवड करण्यात आली असून, त्यातील दोघांना इंजेक्शनद्वारे लस देण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने या प्रयोगातील बदल टिपले जाणार आहेत.
काही देशांमध्ये “बीसीजी’ लसीकरण नियमितपणे केले जाते, तेथे करोनाबाधितांची संख्या आणि मृत्यू दर घटल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. या उलट अमेरिका, इटली या देशांनी लसीकरण सोडून दिले आहे. त्या देशांमध्ये करोनाचा संसर्ग अधिक असल्याचे निरीक्षण अमेरिकेतील न्यूयॉर्क इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या बायोमेडिकल सायन्सेस विभागाने नोंदविले. या संदर्भात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) हा निष्कर्ष लक्षात घेऊन संशोधन करणार असल्याचे स्पष्ट केले होते.
‘आयसीएमआर’च्या आदेशानुसार देशातील चार ठिकाणी प्लाझ्मा थेरपीचा प्रयोग सुरू आहे. त्यामध्ये सुरत, त्रिवेंद्रम, जयपूर आणि पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजचा समावेश आहे. त्या पाठोपाठ मुंबईच्या हाफकिन इन्स्टिट्यूटला ‘आयसीएमआर’ने “बीसीजी’ लसीचा प्रयोग करण्याची परवानगी दिली आहे. या संदर्भात ससून रुग्णालयातील करोनाबाधित रुग्णांना “बीसीजी’ लस देण्यास मान्यता दिली आहे. दरम्यान, बीसीजी लसीचा प्रयोग करण्यासंदर्भात हाफकिन इन्स्टिट्यूटचे अधिकारी ससून रुग्णालयात येऊन गेले. हाफकिनच्या संस्थेला प्रयोग करण्यास ससूनमधील “इथिक्स कमिटी’ने परवानगी दिली आहे. त्याबाबत प्रशिक्षण देण्यात आले.
ससून रुग्णलयात करोनाबाधितांवर “बीसीजी’ लसीचा प्रयोग सुरू केला आहे. त्या सौम्य आणि अतिगंभीर स्वरुपाच्या रुग्णांना देण्याऐवजी मध्यम स्वरुपाच्या रुग्णांना देण्यात येत आहे. सौम्य स्वरुपाचे रुग्ण लवकर बरे होतात. तर गंभीर स्वरुपाच्या रुग्णांना लस दिल्यास त्याचा फायदा होईल की नाही, हे सांगणे शक्य नसते. त्यामुळे या प्रयोगासाठी मध्यम स्वरुपाची लक्षणांच्या रुग्णांची निवड केली जाणार आहे.
-डॉ. मुरलीधर तांबे, अधिष्ठाता, बी. जे. मेडिकल कॉलेज.