पुणे – पीएमपी प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात येणाऱ्या अॅपची चाचणीत पुन्हा तांत्रिक अडचणी दिसून आल्या. मात्र, पहिल्या चाचणीदरम्यान आलेल्या अडचणी निम्यापेक्षा कमी झाल्या असून, आता काही ठरावीक भागात नेटवर्कमुळे ट्रॅन्झेक्शनमध्ये अडथळा येत आहे. त्यामुळे प्रवाशांची कोणतीही गैरसोय होऊ नये, या दृष्टीने अॅपची संपूर्ण चाचणी झाल्यावरच हे अॅप सुरू होणार असल्याचे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मात्र, अजून किती चाचण्या होणार, प्रत्यक्षात अॅप प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार? की गुगल सारखे हे अॅपची गुलदस्त्यात राहणार असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) प्रवाशांसाठी सुरू करण्यात येणाऱ्या अॅपची अंतिम चाचणी येत्या दोन दिवसांमध्ये काही बसमध्ये केली जाणार आहे.
पहिल्या चाचणीत आढळून आलेल्या त्रुटीबरोबरच तिकीटाचे पैसे घेताना काय अडचणी येत नाहीत ना, याची पाहणी केली जाणार आहे. त्यानंतर काही दिवसांमध्येच पीएमपीचे अॅप प्रवाशांसाठी खुले केले जाणार आहे.
पीएमपीच्या बसचे लाइव्ह लोकेशन दिसणारी यंत्रणा गुगल सोबत विकसित केली जात होती. पण, तांत्रिक अडचणीमुळे हे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे पीएमपीने प्रवाशांना त्याच्या अॅपच्या माध्यमातून बसची रिअल टाइम माहिती देण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून पीएमपी अॅपवर काम करत आहे.
या अॅपच्या माध्यमातून प्रवाशांना ज्या बसने जायचे, त्या बसचे शेड्युल पाहून घरबसल्या किंवा कामाच्या ठिकाणावर तिकीट काढता येणार आहे. ज्यावेळी बसने प्रवास करणार, त्यावेळी केवळ वाहकाला स्कॅनर दाखवताच तिकीट आपल्या हातात मिळेल. अॅपवर सोशल मीडियाचे सर्व प्लॅटफॉर्म उपलब्ध असतील. पीएमपीच्या सर्व मार्गांची माहिती देखील यावर मिळणार आहे. बसचे वेळापत्रक आणि पीएमपीचे विविध पास अॅपद्वारे ऑनलाइन काढण्याची सोय असणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून पीएमपीच्या अॅपवर काम सुरू होते. या अॅपचे काम पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी त्याची चाचणी घेण्यात आली. त्यावेळी अॅपमध्ये प्रामुख्याने ट्राझॅक्शन फेल होणे, क्युआरकोडची पडताळणी केल्यानंतर तिकीट लवकर न येणे, तिकीटाची रक्कम व्यवस्थित न दिसणे यासह १५ ते १६ समस्या दिसून आल्या. त्यानंतर अॅप तयार करणाऱ्या कंपनीला तातडीने त्यामध्ये सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार कंपनीकडून बहुतांश त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत. त्यानंतर मागील दोन दिवसात पुन्हा सर्व बसमध्ये ही चाचणी घेण्यात आली. त्यावेळी दोन ते तीन त्रुटी आढळून आल्या असून, त्या सुधारून पुन्हा चाचणी घेऊन अॅप प्रवाशांसाठी खुले केले जाणार आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.