नगर -करोनाबाधित असलेल्या तबलिगी जमातच्या पाच जणांचा अहवाल निगोटिव्ह आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आलेली आहे. त्यातील दोन परदेशी नागरिकांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तीन भारतीय नागरिकांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेने त्यांच्या अटकेची कारवाई केलेली आहे. दिल्लीतील निजामुद्दीन येथील तबलिगी जमातच्या मरकजला हजेरी लावल्यानंतर नगरमध्ये आलेल्या परदेशी नागरिकांवर पोलिसांनी कारवाईचे मोठे पाऊल उचलले आहे. 3 परदेशी नागरिकांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तबलिगी जमातीच्या मरकजसाठी आलेले परदेशी नागरिक हे कायद्याचे उल्लंघन करून नगरमध्ये राहिल्याने त्यांना शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी अटक केली आहे.
तबलिगी जमातच्या मरकजसाठी आलेले परदेशी नागरिक व्हिसाचा गैरवापर करत असल्याचे उघडकीस आले. पर्यटन व्हिसावर आलेले असताना ते व्हिसामधील अटीचे उल्लंघन करून धर्मप्रसार करत असल्याचे पोलीस चौकशीत समोर आले आहे. त्यामुळे नगरला आलेले 29 परदेशी नागरिक व त्यांना मदत करणाऱ्या अन्य पाच नागरिकांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
टुरिस्ट व्हिसा घेऊन भारतात धर्मप्रसार केल्याप्रकरणी जिल्ह्यातील तीन पोलीस ठाण्यांमध्ये वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
यापूर्वी 26 परदेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली होती. उर्वरित दोन परदेशी नागरिक व तीन भारतीय नागरिक करोनाबाधित होत. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना पुढील चौकशीसाठी पोलिसांनी अटक केली. अटक केल्यानंतर न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने परदेशी नागरिकांना सहा दिवस पोलीस कोठडीत करण्याचा आदेश दिला. हे नागरिक इंडोनेशिया व जुबेती देशातील आहेत. तीन भारतीय नागरिकांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.