कणकवली – सिंधुदूर्ग जिल्हा बॅंक निवडणुकीच्या वादातून शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणात आमदार नितेश राणे यांनी दाखल केलेला जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. त्यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. न्यायालयाने हा निकाल देताच फटाके फोडून शिवसैनिकांनी आनंद व्यक्त केला. तसेच आज जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात विलक्षण तणावाचे वातावरण आहे. तेथे शिघ्रकृती दल तैनात करण्यात आले आहे. दरम्यान न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्याचा पर्याय उपलब्ध असल्याचे राणे यांच्या वकिलांनी सांगितले.
जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या प्रचारात बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष सतिश सावंत यांचे प्रचार प्रमुख संतोच परब यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. त्याप्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. एका आरोपीला दिल्लीतून ताब्यात घेण्यात आले होते. हे आरोपी नितेश राणे यांचे निकटवर्तीय असल्याने नितेश यांच्या सुचनेनुसार हा हल्ला झाल्याचे सांगत त्यांच्या अटकेची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली.
पोलिसांनी नितेश यांना समन्स बजावले होते. मात्र गेल्या चार दिवसांपासून नितेश राणे “आऊट ऑफ रिच’ आहेत. त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार लक्षात घेऊन सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी नितेश यांनी धाव घेतली होती.
नितेश यांनी तपासात सहकार्य केले आहे. त्यांना चौकशी वेळी बोलावले त्याच वेळी त्यांचा मोबाईल जप्त करण्यात आला असता.ते केले नाही. राजकीय हेतूने त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे, असा युक्तीवाद नितेश राणे यांचे वकील ऍड. संग्राम देसाई यांनी केला. त्याला विशेष सरकारी वकील घरत यांनी विरोध केला. आरोपींशी नितेश राणे यांच्या स्वीय सहायकाचे संभाषण झाले आहे. त्याचे कॉल डिटेल्स उपलब्ध आहेत, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. दोन दिवस चाललेल्या युक्तीवादानंतर न्यायालयाने काल निकाल राखून ठेवला होता. गुरूवारी दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावल्याचे सांगितले.
कॉल डिटेल्समध्ये नितेश राणे यांच्याशी संपर्क झाल्याचे स्पष्ट होत असल्याचे सांगून त्यांना अटक करून त्यांचा मोबाईल जप्त करणे आवश्यक असल्याचे प्रथमदर्शनी मत न्यायालयाने व्यक्त करत अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळत असल्याचे सांगितले. निकालची अंतिम प्रत रात्री उशीरापर्यंत उपलब्ध होऊ शकली नव्हती.