मुंबई – राज्यात पुन्हा करोना रुग्णसंख्येमध्ये मोठी वाढ होत आहे. आज राज्यात तब्बल 5368 नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यासंदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना माहिती दिली.
वाढत्या करोना रुग्णांमुळे राज्याची चिंता वाढली आहे. राज्यात दुप्पटीने करोना रुग्णसंख्या वाढतेय, 31 डिसेंबर, 1 जानेवारीच्या सेलिब्रेशनला गर्दी करू नका, नागरिकांनी गर्दी टाळावी अन्यथा संसर्ग झपाट्याने वाढेल, लसीकरण न झालेल्या नागरिकांनी लस घ्यावी. टास्क फोर्सच्या बैठकीत लहान मुलांच्या लसीकरणावर चर्चा झाली. निर्बंध कडक करण्यावर मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील, अशी माहिती टास्क फोर्ससोबतच्या बैठकीनंतर राजेश टोपे यांनी दिली.
दरम्यान, आज एकट्या मुंबईत 3928 नवीन करोनाबाधितांची नोंद झाली असून ठाण्यात 864 तर पुण्यात 520 करोनाबाधित आढळून आले आहेत. तर काल राज्यात 3900 नवीन करोनाबाधितांची नोंद झाली होती.