मुंबई – मुंबईत चौथ्या टप्प्यात होणाऱ्या निवडूकीसाठी आज शिवसेना, भाजप व कॉंग्रेसच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरले. अर्ज दाखल करताना या प्रमुख पक्षांनी रोड ढोलताशांच्या गजरात रोड शो, बाईक रॅली काढून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. शक्तिप्रदर्शनाच्या निमित्ताने महाआघाडी आणि महायुतीच्या नेत्यांनी मतदान व कार्यकर्त्यांना ऐकीचे दर्शन घडविले.
मुंबई दक्षिण मतदारसंघातील कॉंग्रेस उमेदवार मिलिंद देवरा, शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांनी आज ओल्ड कस्टम येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केले. देवरा अर्ज भरत असताना उत्साही कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. यावेवी कॉंग्रेसचे भाई जगताप, अमीन पटेल, राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर उपस्थित होते. तर अरविंद सावंत यांचा अर्ज भरताना युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, खासदार अनिल देसाई, आमदार राज पुरोहित, मंगलप्रभात लोढा, अजय चौधरी, श्रध्दा जाधव, आशीष चेंबूरकर यांनी उपस्थिती लावली होती.
दक्षिणमध्य मुंबईतून कॉंग्रेसचे एकनाथ गायकवाड आणि शिवसेनेच्या राहुल शेवावे यांनी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज भरताना दोघांनी शक्तिप्रदर्शन केले. यावेवी महाआघाडी आणि महायुतीचे नेते, पदाधिकारी सोबत होते. उत्तरमध्य मुंबईतून कॉंग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांनी वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेवी अभिनेता संजय दत्त, माजी आमदार बाबा सिद्दीकी हे प्रिया यांच्यासोबत होते. प्रिया दत्त यांची लढत भाजपच्या पूनम महाजन-राव यांच्याशी आहे. पूनम यांनी याआधीच अर्ज दाखल केला आहे.
ईशान्य मुंबईतून भाजप उमेदवार मनोज कोटक यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेवी भाजपकडून उमेदवारी नाकारण्यात आलेले किरीट सोमय्या, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, शिवसेना नेते लीलाधर डाके, आमदार सुनील राऊत उपस्थित होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार संजय दिना पाटील हे उद्या (मंगळवार) अर्ज भरणार आहेत.
मुंबई वायव्य मतदारसंघातून कॉंग्रेसच्या संजय निरूपम यांनी कार्यकर्त्यांच्या गर्दीत अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी निरूपमय यांनी अनेक धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. उत्तर मुंबईतील कॉंग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी रोड शो करत अर्ज भरला. मातोंडकर यांची लढत भाजपच्या गोपाळ शेट्टी यांच्याशी आहे. शेट्टी यांनी याआधीच अर्ज दाखल केला आहे.