खासदार समाजाच्या बाजूचा हवा

वळसे पाटील ः जुन्नर तालुक्‍यातून डॉ. कोल्हे यांच्या प्रचाराला प्रतिसाद

जुन्नर –
यंदाची लोकसभा निवडणूक महत्त्वाची आहे. देशात जे खासदार निवडून पाठवणार आहेत, त्यातूनच देशाचा पंतप्रधान निवडला जाणार आहे. मग निर्णय आपल्याला हा करायचा आहे. आपल्या भागातून जाणारा खासदार हा शेतकऱ्यांच्या, ग्रामीण भागाच्या आणि सर्व समाजाच्या बाजूने उभा राहणारा निवडून पाठवायचा आहे की, नरेंद्र मोदींसारखा एककल्ली कारभार करणारा पंतप्रधानांच्या बाजूने उभा राहणारा आढळरावांसारखा उमेदवार पाठवायचा? असा सवाल करुन डॉ. अमोल कोल्हे यांना निवडून द्यावे, असे आवाहन विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी केले.
शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीनिमित्त जुन्नर विधानसभा मतदार संघात महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचार दौऱ्यात पारुंडे येथे झालेल्या सभेत दिलीप वळसे पाटील बोलत होते.

यावेळी उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्यासह ब्रम्हनाथ देवालयाचे महंत चंद्रप्रकाश, गणपतराव फुलवडे, अतुल बेनके, सत्यशील शेरकर, शरद लेंडे, उज्ज्वला शेवाळे, सूरज वाजगे, पूजाताई बुट्‌टे पाटील, पांडुरंग पवार आदींसह मान्यवर उपस्थित होते. वळसे पाटील म्हणाले, आताच गणपतराव फुलवडे यांनी सांगितले की, अमोल कोल्हे निवडून गेले. उद्या दिल्लीत पवार असतील, राहुल गांधी असतील व बाकीचे मित्रपक्ष असतील, त्यांनी मोठी महाआघाडी निर्माण करून या जातीयवादी, जुलमी सरकारला पर्याय देण्यासंदर्भात भूमिका देशाच्या पातळीवर स्वीकारली आहे. आज या जुन्नर तालुक्‍यात सहा धरणे झाली. शेती फुलली आहे.

शिक्षणाची व्यवस्था झाली आहे, इंजिनिअरिंग, मेडिकल यांसह अन्य शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून शिक्षणाची व्यवस्था झाली आहे. मेहनत करून चार पैसे शेतकऱ्यांना मिळत आहेत. आज आपले राहणीमान सुधारले आहे, हे सर्व झाले गेल्या 70 वर्षांच्या कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या प्रयत्नांमुळे आज मोदी जे करत आहेत, ते कदाचित लोकशाही मोडण्याचा प्रयत्न करीत आहे. सीबीआय, सुप्रीम कोर्ट, रिझर्व्ह बॅंक या संस्थांना मोडण्याचा प्रयत्न करीत आहे. भारतनरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार काय, घटना मोडण्याचा प्रयत्न होतो काय अशी शंका निर्माण झाली आहे. आपले उमेदवार डॉ. अमोल कोल्हे हे उच्चशिक्षित आहेत. व्यवसाय करत असताना चार पैसे मिळवता आले असते. पण छत्रपती शिवाजीमहाराज, छत्रपती संभाजीमहाराज यांचा इतिहास जगात नेण्यासाठी ते पुढे आले.

आपल्या तालुक्‍यात पवारसाहेबांमुळे निवृत्तीशेठ शेरकर यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली होती. आज डॉ. कोल्हे यांना दिली आहे. पवारसाहेब रत्नपारखी आहेत. आज सहाही विधानसभा मतदारसंघात डॉ. अमोल कोल्हे यांना भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. अगदी लांडेवाडी गावानेही जय्यत तयारी केली आहे. आम्ही जनतेच्या हिताचा जाहीरनामा केला आहे आणि तो पूर्ण करणार यात निश्‍चित शंका नाही. यावेळी उमेदवार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, मी जनतेच्या हितासाठी कार्यरत असणार आहे. माझी नाळ समाजाशी जुळलेली आहे. यावेळी ज्येष्ठ नेते गणपतराव फुलवडे, अतुल बेनके यांच्यासह मान्यवरांची भाषणे झाली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.