कलंदर: संकल्प…

उत्तम पिंगळे

(रविवारी प्राध्यापक विसरभोळेंना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेलो होतो)
मी: (नमस्कार करून) सर, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. काल गुढीपाडवा झाला म्हणून बोललो होतो, आज शुभेच्छा देण्यास जाऊ.
विसरभोळे: (चहा घेतानाच नोकराला आणखी एक कप आणण्याची सूचना करतात)
मी: मग काय सर, माझ्यासाठी पाडव्याच्या मुहूर्तापासून काही नवीन संकल्प?
विसरभोळे: नवीन संकल्प वगैरे काही नाही; पण तुमच्या बोलण्यावरून तुम्ही काहीतरी नवीन संकल्प केला असे वाटते?
मी: तेच सांगायला आलो आहे. मी रोज सकाळी 40 मिनिटे चालण्याचा संकल्प केला आहे. म्हणजे घरातून घड्याळ लावून 20 मिनिटे चालत जायचे व पुन्हा घराकडे परत यायचे. माझ्या मित्रांनीही काही वेगेवेगळे संकल्प घेतलेले आहेत.
विसरभोळे: तुम्हाला चालायची सवय आहे?
मी: नाही, म्हणून तर संकल्प केलेला आहे.
विसरभोळे: मग तुम्हाला कोणी सांगितले की हाच संकल्प करायला हवा?
मी: नाही, कुणी नाही सांगितलं; पण सर्वांनी काहीतरी संकल्प करायचा ठरवले आणि तुम्हालाही विचारायला आलो की, तुम्ही कोणता संकल्प करणार?
विसरभोळे: आधी तो चहा घ्या. थंड होतोय.आता मला विचारलेच म्हणून सांगतो. प्रथमत: मला हे संकल्प वगैरे पटत नाहीत.
मी: सर, का बरे?
विसरभोळे: त्याचं काय आहे माहीत आहे का? माझा असा अभ्यास आहे की, असे संकल्प साधारणतः 80 टक्के अयशस्वी होतात.
मी: कसं काय बरे?
विसरभोळे: माझ्या कितीतरी मित्रांनी असे विविध संकल्प एक जानेवारी किंवा पाडव्यापासून सुरू केले. पण बहुतेक वेळी “नव्याचे नऊ दिवस’ या म्हणीप्रमाणे ते सुरू होऊन पहिले काही दिवस उत्साहाने केले जाते, मग नंतर हळूहळू येरे माझ्या मागल्या. काही दिवसांनंतर तो संकल्पही विसरून जाणारे पाहिलेले आहेत. माझ्या दुसऱ्या मित्रानेही सकाळी चालण्याचा संकल्प केला होता. पहिली चारपाच दिवस चांगला चालला. मग पाय दुखू लागले. अचानक पाऊस पडला. मग एक दोन दिवसांच्या अंतराने पुन्हा चालू केला; पण महिनाभरात पूर्णपणे बंद पडला.
मी: पण म्हणूनच मी कालच्या शुभमहुर्तावर चालायचेच आहे, असे म्हणून संकल्प सुरू केला आहे.
विसरभोळे: रोज चालणे केव्हाही चांगले; पण तुम्हाला एक माहीत आहे का? जडत्वाचा नियम म्हणजे कोणताही बदल स्वीकारला तर, कोणाची बॉडी किंवा तब्येत प्रथम विरोध करते. तुम्हाला राग येईल, पण मनाने जर शरीरावर कुरघोडी केली तरच अशा प्रकारचे संकल्प तडीस जाऊ शकतात आणि मी स्पष्टच सांगतो की तुमचाही संकल्प किती दिवस टिकेल हे तुम्हीच पाहा. मुळातच मुहूर्त व नवीन वर्षे पाहून केलेले संकल्प असेच पडून राहतात. कारण मनातून खरोखर काही करायची इच्छा असेल तर त्याला मुहूर्त लागतच नाही. मनाला पक्की खूणगाठ बांधली की ठरलेला संकल्प हळूहळू पार पडू शकतो. आपण फक्‍त पंधरा मिनिटे चालायला सुरुवात करा. हळूहळू शरीरालाही त्याची सवय होईल आणि मग तुम्ही वेळ वाढवू शकता. कुणी व्यायामाचा संकल्प करतात, कुणी लिहिण्याचा, कुणी बोलण्याचा संकल्प करतात; पण तेच यशस्वी होतात ज्यांचे मन शरीरावर कुरघोडी करते. म्हणूनच म्हणतो नीट विचार करा व केलेला संकल्प पूर्णपणे तडीस नेण्याचा प्रयत्न करा.
मी: होय, सर बरोबर म्हणता आपण.
विसरभोळे: आता मी तुम्हाला एवढे लेक्‍चर दिले; पण माझे मन तरी कुठे स्थिर आहे? तुम्ही मला माझ्या संकल्पाविषयी विचारले होते. कोणताही नवीन संकल्प न करणे हाच माझा कायमचा संकल्प आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.