Mahadev Betting App – महादेव बेटिंग ॲप (Mahadev Betting App) प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडी (ED) कडून सातत्याने कारवाई सुरू आहेत.
आतापर्यंत मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ, महाराष्ट्राची राजधानी मुंबई , पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता यासह एकूण 39 ठिकाणी छापे टाकले होते. या छाप्यात सोन्याची नाणी, दागिन्यांसह 417 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत.
पण झडतीदरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात कागदपत्रे आणि पुरावे सापडले. छाप्यादरम्यान मिळालेल्या कागदपत्रांमध्ये 14 बॉलिवूड स्टार्सची नावेही आढळली.
आता ईडीचे अधिकारी त्या बॉलीवूड स्टार्सवर लक्ष ठेवले असून ऑनलाइन बेटिंग अॅपद्वारे फसवणूक प्रकरणात बॉलिवूड सेलिब्रिटींशी संबंधित माहिती गोळा केली जात आहे. ईडीने श्रद्धा कपूर, कपिल शर्मा, रणबीर कपूर यांच्यासह अनेक बॉलिवूड कलाकारांना चौकशीसाठी समन्स पाठवलं होतं.
मात्र, अश्यातच आता ईडीने मुंबईतील अनेक बड्या बॉलिवूड प्रोडक्शन हाऊसवर छापे टाकले असल्याचं दिसून आलं आहे. मुंबईत पाच वेगवेगळ्या ठिकाणी तपास यंत्रणेकडून छापेमारी सुरू आहे.
ईडीने शुक्रवारी बॉलिवूड प्रोडक्शन ‘कुरेशी हाऊस’वर छापा टाकला आहे. कुरेशी प्रोडक्शनच्या माध्यमातून पैशांचा व्यवहार झाल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला आहे.
कुरेशी प्रोडक्शन हे वसीम कुरेशी आणि तबस्सुम कुरेशी चालवत असल्याची माहिती समोर आला आहे. महादेव ॲपचे प्रवर्तक सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांच्याकडून कुरेशी प्रोडक्शनला चित्रपट बनवण्यासाठी आर्थिक मदत मिळाली होती.
दरम्यान, महादेव बेटिंग ॲपचे प्रमोटर सौरभ चंद्राकर आणि रवि उप्पल असून ते दुबईत बसून हे ॲप ऑपरेट करतात. याच वर्षी महादेव ॲप चालवणारा सौरभ चंद्राकरने UAE मध्ये लग्न केलं होतं.
फेब्रुवारीमध्ये त्याचं लग्न झालं. या लग्नात 200 कोटी रुपये खर्च करण्यात आला होता. या ग्रँड वेडिंगसाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना, कलाकार, गायकांना त्याच्या लग्नात परफॉर्म करण्यासाठी निमंत्रित करण्यात आलं होतं.