महाबळेश्वर – महाबळेश्वर तालुक्यातील महाविकास आघाडीतील मतभेद सोळशी विकास सेवा सोसायटी, गोगवे या संस्थेच्या निमित्ताने चव्हाट्यावर येत आहेत. या संस्थेच्या संचालक मंडळाने जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी नाव निवडण्याचा जो ठराव केला आहे. त्या ठरावाला अनेक सभासदांनी विरोध केला असून संचालक मंडळाऐवजी सर्व सभासदांची सर्वसाधारण सभा आयोजित करून सर्वानुमते ठराव करण्याची मागणी करण्यात येत आहे.
सोळशी विकास सेवा सोसायटीत गेली अनेक वर्षे राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आहे. विद्यमान संचालक मंडळात 13 पैकी शिवसेनेचे केवळ दोन संचालक आहेत. या संस्थेतील सत्ताधारी संचालक व त्यांचे नातेवाईकांकडे असलेल्या मोठ्या थकबाकीमुळे ही संस्थाच जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या थकबाकीदार संस्थेच्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहे.
सध्या जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी मतदानाचा अधिकार असलेल्या व्यक्तीची निवड करणारे ठराव मागविण्यात आले आहेत. गोगवे विकास सेवा सोसायटीच्या विद्यमान संचालक मंडळाने मनमानी करून ठराव करू नये अशी अनेक सभासदांनी मागणी केली होती.
परंतु या मागणीकडे दुर्लक्ष करून संचालक मंडळाने एकनाथ धोंडीबा कदम यांना मतदानाचा अधिकार देणारा ठराव करून तो तालुका निबंधकाकडे पाठविण्यात आला आहे. संचालक मंडळाने परस्पर मनमानी पध्दतीने ठराव केल्याने या 17 गावातील सोसायटीच्या सभासदांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. हा ठराव रद्द करून पुन्हा संस्थेच्या सभासदांची निवडणूक घेवून ठराव पुन्हा करण्याची मागणी सभासदांनी केली आहे. त्यामुळे या सोसायटीच्या निमित्ताने महाविकास आघाडीतील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत.