निष्काळजीपणाचा कहर! करोनाबाधित तरुणाची लग्नात उपस्थिती; संपूर्ण गाव करावं लागलं ‘सील’

निवाडी – करोना विषाणूची दुसरी लाट भारतासाठी अत्यंत घातक ठरत आहे. दररोज सापडणाऱ्या नव्या बाधितांची संख्या धडकी भरवणारी असून यामुळे आरोग्ययंत्रणेवरही प्रचंड ताण आलाय. करोनामुळे गंभीर संसर्ग होणाऱ्या रुग्णांची संख्या व मृत्यू देखील या लाटेत वाढलेत.

परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली असली तरी नागरिकांमध्ये याचे गांभीर्य असल्याचे दिसून येत नाही. याचीच प्रचिती मध्यप्रदेशातील निवाडी (niwari) जिल्ह्यात असलेल्या लुहरगुवा गावात आला आहे. येथील अरुण मिश्रा नामक तरुणाच्या निष्काळजीपणाचा फटका संपूर्ण गावाला बसलाय.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, अरुण मिश्रा या युवकाचा करोना अहवाल २७ एप्रिलरोजी पॉझिटिव्ह आला होता. मात्र तरीदेखील या तरुणाने करोनासबंधित नियमांची पायमल्ली करत २९ एप्रिलरोजी गावात झालेल्या एका विवाहसोहळ्याला उपस्थिती लावली. येथे त्याने उपस्थितांना भोजन वाढण्याचे कामही केले.

हाच तरुण दुसऱ्या दिवशी वरातीत उत्तर प्रदेशातील ललितपूर जिल्ह्यातील भुचेरा गावालाही गेला. तेथे तो अनेकांच्या संपर्कात आला आणि नवरदेव-नवरीसोबत फोटोही काढले. यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या अनेकांना करोनासबंधित लक्षण जाणवू लागली.

तब्बल ६० जणांना त्रास जाणवू लागल्याने त्यांनी आपली कोव्हीड चाचणी करून घेतली. यातील तब्बल ४० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास येताच जिल्हाधिकारी आशीष भार्गव यांनी संपूर्ण गाव रेड झोन घोषित करत सील केला. या गावाला जोडले गेलेले सर्व रस्तेही बंद करण्यात आले आहेत. याशिवाय लोकांनी घरातून बाहेर पडू नये यासाठी पोलिसांनाही गावात तैनात करण्यात आले आहे. या घटनेनंतर जवळपासच्या गावातही भीतीचे वातावरण आहे.

मे महिन्यात लग्न सोहळे नकोच

राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज राज्यात १५ मेपर्यंत लॉकडाऊन घोषित केला. यावेळी त्यांनी लग्न सोहळे करोनाचे सुपर स्प्रेडर ठरत असल्याचे सांगत नागरिकांनी लग्नसोहळे मे महिन्यात घेऊ नयेत यासाठी जनजागृती करण्याची विनंती लोकप्रतिनिधींकडे केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.