मुंबई : माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष अजित सिंह यांच्या निधनाचे वृत्त समजून अतिशय दुःख झाले. अजित सिंह यांनी देशाच्या तसेच उत्तर प्रदेशच्या राजकारणात प्रदीर्घ काळ महत्वाची भूमिका बजावली. माझा अजित सिंह यांचा घनिष्ट परिचय होता. संसद सदस्य या नात्याने शेतकऱ्यांच्या समस्यांना त्यांनी नेहमी वाचा फोडली.
ईश्वर दिवंगत अजित सिंह यांच्या आत्म्यास आपल्या श्रीचरणांजवळ स्थान देवो अशी प्रार्थना करतो व आपल्या शोकसंवेदना त्यांच्या कुटुंबियांना कळवतो, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या संदेशामध्ये म्हटले आहे.
दरम्यान, राष्ट्रीय लोक दलाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अजित सिंह यांचे करोनामुळे निधन झाले आहे. ते 82 वर्षाचे होते. 20 एप्रिल रोजी अजित सिंह यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यांची तब्बेत मंगळवारी रात्री अचानक बिघडल्यामुळे गुरुग्राम येथील एका खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
राष्ट्रीय लोक दलाचे प्रमुख असलेले अजित सिंह हे पश्चिम उत्तर प्रदेशचे महत्वाचे नेते होते. त्यांना फुफ्फुसाचे इन्फेक्शन झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करावे लागले होते. त्यांच्या निधनाची वार्ता अजित सिंह यांचे पुत्र आणि माजी खासदार जयंत चौधरी यांनी दिली आहे.