मुंबई – फाफ डुप्लेसीने केलेल्या अफलातून खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुने आयपीएल स्पर्धेतील मंगळवारी झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्ससमोर विजयासाठी 182 धावा करण्याचे आव्हान ठेवले. बेंगळुरुचा माजी कर्णधार विराट कोहली या सामन्यातही अपयशी ठरला. त्याला खातेही उघडता आले नाही. शाहबाज अहमद, ग्लेन मॅक्सवेल व दीनेश कार्तिक यांनी उपयुक्त फलंदाजी करत संघाच्या धावसंख्येला हातभार लावला.
लखनौचा कर्णधार लोकेश राहुलने नाणेफेक जिंकत बेंगळुरुला प्रथम फलंदाजी दिली. लखनौचा वेगवान गोलंदाज दुष्मंत चमिराने डावाच्या पहिल्याच षटकातील पाचव्या चेंडूवर सलामीवीर अनुज रावतला तर सहाव्या चेंडूवर कोहलीला बाद करत धडाक्यात सुरुवात केली. यंदाच्या स्पर्धेत भरात असलेला रावत बाद झाल्यानंतर कोहलीचेही अपयश कायम राहिले. त्यानंतर एका बाजूने कर्णधार डुप्लेसीने आक्रमक फलंदाजी केली. त्याने ग्लेन मॅक्सवेल व शाहबाद अहमद यांच्यासह महत्वपूर्ण भागदाऱ्या करत संघाला समाधानकारक धावसंख्या उभारुन दिली.
मॅक्सवेलने 11 चेंडूत 3 चौकार व 1 षटकार फटकावताना 23 धावा केल्या. अहमदने 22 चेंडूत 1 चौकार फटकावताना 26 धावांची खेळी केली. त्याने अर्धशतकानंतर शतकाकडे कूच केली असतानाच त्याला अनावश्यक फटकेबाजीचा मोह टाळता आला नाही व त्याचे शतक पुर्ण होऊ शकले नाही. तो 64 चेंडूत 11 चौकार व 2 षटकारांची आतषबाजी करत 96 धावांवर बाद झाला. कार्तिकने नाबाद 13 धावा केल्या. बेंगळुरूचा डाव 20 षटकांत 6 बाद 181 धावांवर रोखला गेला. लखनौकडून जेसन होल्डर व दुष्मंत चमिरा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. कृणाल पंड्याने 1 बळी घेतला.
संक्षिप्त धावफलक –
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु – 20 षटकांत 6 बाद 181 धावा. (फाफ डुप्लेसी 96, शाहबाद अहमद 26, ग्लेन मॅक्सवेल 23, जेसन होल्डर 2-25, दुष्मंत चमिरा 2-31, कृणाल पंड्या 1-29).