Hingoli Lok Sabha Election 2024 – लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे वर्चस्व राहिलेल्या हिंगोली मतदारसंघामध्ये यावेळी शिवसेना ठाकरे गट विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशी लढत पाहायला मिळणार आहे स्पष्ट झाले आहे. ही लढत हेमंत पाटील विरुद्ध नागेश पाटील आष्टीकर यांच्यात रंगणार आहे.
महायुतीच्या जागावाटपाच्या तिढ्यामध्ये हा मतदारसंघ अडकला होता. मात्र हा तिढा सुटला असून शिंदे गटाकडेच ही जागा राहणार आहे. शिंदेंनी विद्यमान खासदार हेमंत पाटील यांनाच पुन्हा मैदानात उतरवले आहे.
महाविकास आघाडीत हा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडं असून त्यांनी आधीच नागेश पाटील आष्टीकर यांना उमेदवारी जाहीर केली.
सध्या हिंगोलीमध्ये असलेले विद्यमान शिवसेना खासदार हेमंत पाटील हे शिंदे गटामध्ये आहेत. त्यांनी जागा आपल्याच मिळणार असा दावा वारंवार केला होता. पण भाजपनेही या जागेसाठी जोर लावलेला पाहायला मिळाला म्हणूनच एवढ्या उशिरा येथील उमेदवारी जाहीर करण्यात आली.
आता शिंदे गटाकडे ही जागा कायम राहिल्यामुळे किमान या मतदारसंघात तरी खरी शिवसेना कुणाची ठाकरेंची की शिवसेनेची याचा निकाल लावण्याची संधी मतदारांच्या हाती असणार आहे. दरम्यान, हिंगोलीत दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला मतदान होणार असून 4 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरची मुदत आहे.