Lok Sabha Election 2024 – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार विरुद्ध काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्यात लढत होणार आहे. सुधीर मुनगंटीवारांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून आज पर्यंत कधीही एवढ्या प्रचंड मतांनी उमेदवार निवडून आला नसेल, तेवढ्या मतांनी मुनगंटीवार निवडून येणार असल्याचा विश्वास या वेळी फडणवीस आणि बावनकुळे यांनी या वेळी व्यक्त केला. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात यावेळी इतिहास रचला जाणार असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने यावेळी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे. वास्तविक सुधीर मुनगंटीवार हे या मतदारसंघासाठी इच्छुक नव्हते. मला केंद्रात नव्हे तर राज्यातच लोकांची कामे करायची आहे, असे त्यांनी आधीच सांगितले होते.
मात्र, तरी देखील भाजपच्या पहिल्याच यादीत सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यामुळे विरोधकांनी देखील भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली.
धानोरकरांच्या पत्नी रिंगणात
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 2019 मधील मागील निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराने विजय मिळवला होता. सुरेश धानोरकर यांच्या रूपाने महाराष्ट्रात काँग्रेसचे एकमेव खासदार विजयी झाले होते.
मात्र, त्यांचे निधन झाल्याने यावेळी काँग्रेसच्या वतीने त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने सुधीर मुनगंटीवार यांना मैदानात उतरवले आहे. त्यामुळे या वेळी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची चर्चा राज्यात सर्वत्र दिसून येत आहे.
गेल्या निवडणुकीचे चित्र
लोकसभेच्या 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत चंद्रपूर मतदार संघातून काँग्रेसचे सुरेश धानोरकर विजयी झाले होते. त्यांनी भाजपचे हंसराज अहीर यांचा पराभव केला होता. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीकडून राजेंद्र महाडोळे रिंगणात होते.
– सुरेश धानोरकर (काँग्रेस) – 5,59,507 (विजयी)
– हंसजार अहीर (भाजप) – 5,14,744
– राजेंद्र महाडोळे (वंचित बहुजन आघाडी) – 1,12,079