Himachal Politics : हिमाचलात कॉंग्रेसच्या सहा बडतर्फ आमदारांना भारतीय जनता पक्षाने तेथील पोट निवडणुकीत उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या निकालानंतर कॉंग्रेस पुढे मोठे आव्हान निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या सहा आमदारांनी कॉंग्रेस सरकारच्या विरोधात बंडखोरी केल्यानंतर त्यांना कॉंग्रेसने पक्षांतर बंदी कायद्यान्वये विधानसभेतून अपात्र ठरवले आहे. त्यामुळे या सहाही ठिकाणी पुन्हा पोट निवडणूक जाहीर झाली आहे. या सहाही जणांना भाजपने उमेदवारी दिली आहे.
राजिंदर सिंग राणा, सुधीर शर्मा, चैतन्य शर्मा, रवी ठाकूर, इंदर दत्त लखनपाल आणि दविंदर भुट्टो अशी या आमदारांची नावे आहेत. त्यांनी राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या विरोधात भाजपचे उमेदवार हर्ष महाजन यांच्या बाजूने क्रॉस व्होट केले होते.
काँग्रेसच्या बंडखोर आमदारांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबतच, शुक्रवारी (२२ मार्च) भाजप नेत्यांच्या उपस्थितीत आपल्या पदाचा राजीनामा देणारे तीन अपक्ष आमदारही भाजप मध्ये दाखल झाले, त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा पोट निवडणुकीत भाजपची स्थिती मजबूत झाली आहे.