Lok Sabha Election 2024 – पक्षाच्या बैठकीत भाजप उमेदवार रक्षा खडसे आणि पदाधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी झाली आहे. मंत्री गिरीश महाजन हे देखील या बैठकीला उपस्थित होते. त्यांच्यासमोर एका पदाधिकाऱ्याने रक्षा खडसे यांना प्रश्न विचारले अशी माहिती आहे. भाजपच्या बैठकीतील वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
समोर आलेल्या व्हिडिओमध्ये एकनाथ खडसे यांचे नाव घेतात मात्र मंत्री गिरीश महाजन यांचे नाव का घेत नाही? असे पदाधिकाऱ्यांनी रक्षा खडसेंना विचारले. तसेच रक्षा खडसे भाजपच्या कार्यकर्त्यांना सोडून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन फिरत आहेत. त्यांच्या गाडीत तुतारीची लोक असतात, असा आरोप कार्यकर्त्यांनी केला. मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर यासंदर्भात उघड नाराजी पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
व्हिडिओत कार्यकर्ते म्हणतात, ”आम्ही मतदान भाजपलाच करू. 101% कमळ निवडून येणार आहे. पण कार्यकर्त्यांना डावलले जात आहे. रक्षा खडसे भाजप कार्यकर्त्यांऐवजी सुधाकर जावळे यांना घेऊन फिरतात. भाऊ समोर जोरात बोलू नका…..
शपथ घेऊन सांगा गाडीत भाजपचे कार्यकर्ते असतात की तुतारीचे कार्यकर्ते…. तुम्ही एकनाथ खडसे यांचे नाव घेतात, पण गिरीश महाजन यांचे नाव घेत नाही?” अशा आरोपांचा भडीमार भाजप कार्यकर्ते रक्षा खडसे यांच्यावर करताना व्हिडिओत दिसत आहेत.
महाजनांचा कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न
कार्यकर्ते आणि रक्षा खडसे यांच्यात वाद सुरू असताना मंत्री गिरीश महाजन कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे भाजपमध्ये अंतर्गत कलह तसेच रक्षा खडसे यांच्या विरोधात पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी समोर आली आहे. बैठकीला आमदार, पदाधिकारी तसेच जळगाव लोकसभेच्या उमेदवार स्मिता वाघ यांचीही उपस्थिती असल्याचे व्हिडिओत दिसत आहेत.