पुणे(प्रतिनिधी) :- करोनाची साखळी तोडण्यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह काही ग्रामीण भागात दहा दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. हा लॉकडाऊन दि. 23 जुलैला मध्यरात्री 12 वाजता संपणार आहे. यानंतर मात्र दि.24 जुलैपासून पुणे जिल्ह्यात लॉकडाऊन करणार नाही, अशी स्पष्ट माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. दरम्यान, यापुढील काळात गर्दी टाळण्यासाठी मात्र कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी यांनी दिला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात राम यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. जुलै महिन्यात शहरासह ग्रामीण भागात करोना बाधितांची संख्या वाढल्याने लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. लॉकडाऊन जाहीर करताना कोणाला त्रास व्हावा, असा कोणताही हेतू नव्हता. एमआयडीसीतील अनेक कंपन्यांच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा केली. त्यांना मनुष्यबळाचा कोणताही त्रास जाणवला नाही. एमआयडीसीमधील कंपन्यांनी एकही तक्रार याविषयी प्राप्त झालेली नाही. त्रास देण्यासाठी लॉकडाऊन नसल्याचे जिल्हाधिकारी राम यांनी यावेळी स्पष्ट केले.
करोना कधीपर्यंत संपेल हे माहित नाही. मात्र सर्वांनी चांगल्या प्रकारे काळजी घेणे आवश्यक आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये नियमांची अधिक काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
पुणे शहरात करोनाचा पहिला रुग्ण आढळल्यापासून आजअखेर प्रशासनाकडून रुग्ण संख्या नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने विशेष उपाय योजना करण्यात येत आहेत. तर त्याच दरम्यान तपासण्या देखील वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्ण संख्या जरी वाढत असली, तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये. पुढे येऊन उपचार घ्यावेत. कोणत्याही रुग्णाला बेड कमी पडू देणार नाही. तसेच सध्याची परिस्थिती लक्षात घेता, शहरी भाग आणि त्यानंतर ग्रामीण भागातील रुग्णाची संख्या नियंत्रणात येण्यास मदत होईल असा विश्वास जिल्हाधिकारी राम यांनी व्यक्त केला.