पुणे : बार कौन्सील ऑफ महाराष्ट्र आणि गोवाची ऑनलाईन विमा योजना महाराष्ट्र, गोवा राज्य आणि दादरा नगर हवेली आणि दिव दमण् या दोन केंद्रशासित प्रदेशातील वकिलांना 24 जुलैपर्यंत काढता येणार आहे.
वकिलांच्या मागणीवरून ही मुदत वाढविण्यात आली आहे. यामध्ये करोना, सर्व पॅडेमिक आणि पहिल्या दिवसापासूनचे सर्व आजार कवर होणार आहेत. 1 ते 10 लाखाचे सुरक्षा कवच या योजनेत वकिलांना मिळणार असल्याची माहिती बार कौन्सील ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे सदस्य आणि इन्शुरन्स कमिटीचे चेअरमन ऍड. राजेंद्र उमाप यांनी दिली.
सत्तर वर्षापर्यंतच्या वकिलांना याचा लाभ घेता येणार आहे. 13 जुलै पासून योजना सुरू झाली आहे. पॉलिसी क्रमांक 11170034200400000031 असा आहे. विम्याचा हप्ता वय आणि वकील घेत असलेली इन्शुरन्सच्या रक्कमेवर अवलंबून आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पॉलिसी काढता येणार असून, पैसे भरण्याची ऑनलाईन व्यवस्था करण्यात आली आहे. कोणत्याही वैद्यकीय तपासाची गरज नाही. पती-पत्नी अणि पंचवीस वर्षापर्यंतच्या दोन मुलांचा समावेश आहे. या पॉलिसीची नोटीस आणि लीफलेट बार कौन्सिलच्या www.barcouncilmahgoa.org संकेतस्थळावर आहे. तसेच, ऑनलाइन अर्ज करण्यासाठी असलेली लिंक apps.barcouncilmahgoa.org देखील उपलब्ध आहे.