जळोची : बारामती शहरात मागील काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. हा वाढता प्रादुर्भाव कमी करण्याच्या दृष्टीने शहरात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी दि. १६ ते दि.२३ जुलै पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.अशी माहिती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी शासकीय आदेशान्वये दिली आहे.
कोरोना मुक्त बारामतीत पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्याने नागरिकांंसह प्रशासनाची चिंता वाढली होती. या पार्श्वभूमीवर पुढील 7 दिवसांसाठी बारामती शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहे. या कालावधीत सर्व प्रकारचे व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आव्हान प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दि.१६ जुलैपासून शहरात लागू होत असलेल्या प्रतिबंधित क्षेत्रात वयोवृद्ध, गरोदर महिला,१० वर्षां खालील मुले यांच्यासह मधुमेह, रक्तदाब, दमा आधी आजार असणाऱ्या व्यक्तींना वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही. तसेच शहरातील सर्व किराणा दुकाने व सर्व किरकोळ व ठोक विक्रेत्यांसह इतर व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांची दुकाने बंद राहणार आहेत. मात्र सकाळी 9 ते दुपारी 1 या कालावधीत केवळ अत्यावश्यक वस्तू व सेवा पुरवणारी दुकाने खुली असणार आहेत.
…यांना असणार मुभा
शासकीय कर्मचारी, न्यायपालिका कर्मचारी, अधिकारी, न्यायाधीश, वकील,डॉक्टर, नर्स, अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर, वर्तमानपत्र,प्रिंट, डिजिटल मिडीयाचे कर्मचारी, फार्मा, संबंधित मेडीकल दुकानाचे कर्मचारी, दूध विक्रेते, अत्यावश्यक सेवा ज्यात कृषी, बी बीयाणे, खते, गॅस वितरक, पाणीपुरवठा, आरोग्य अधिकारी कर्मचारी, महावितरण कंपनीचे कर्मचारी, पोलिस, महसूल, नगरपालिका कर्मचारी.
…हे असणार बंद
मटण, चिकन, अंडी, मासे विक्री 16 ते 19 जुलैपर्यंत पूर्णपणे बंद, तर 20 ते 23 जुलै दरम्यान सकाळी 9ते दुपारी 1 पर्यंत सुरू असतील.
सर्व किरकोळ व ठोक विक्रीची ठिकाणे आडत, भाजी मार्केट, फळविक्रेते,आठवडी व दैनिक बाजार, फेरीवाले व कृषी उत्पन्न बाजार समिती 16 ते 19 जुलैपर्यंत पूर्णपणे बंद, तर 20 ते 23 जुलैदरम्यान सकाळी 9 ते दुपारी 1 पर्यंत सुरु असतील.
सर्व केश कर्तनालय, सलून, ब्युटी पार्लर, स्पा यासह हॉटेल, रेस्टॉरंट, लॉज, बार, मार्केट, मॉल हे 23 जुलैपर्यंत पूर्णतः बंद असतील.