सहकारनगर : सातारा रस्ता, पंचमी हॉटेल शेजारील कचऱ्याला लागलेली आग वाढत जाऊन शेजारी ठेवलेले टायर व एक गैरेंजचा स्टॉल जळून खाक झाले. आगीच्या ठिकाणीच मागे पर्वती दर्शन वसाहत असून दाटीवाटीत लहान घरे असून आग पसरेल अशी शक्यता वाटल्याने अनेकांनी घराबाहेर पळ काढला होता.
आगीचे कारण नक्की समजू शकले नाही. मात्र येथे मागील वसाहतीमधील व्यसनी लोक येथे बसून धूम्रपान करत असतात त्यामुळे आग लागली असल्याची शक्यता येथील नागरिकांनी वर्तवली आहे.
नगरसेवक रघुनाथ गौडा म्हणाले की, रस्त्यालगत लागलेली आग आटोक्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली. अग्निशामक दलाच्या 2 गाड्या वेळेत पोहचून आग आटोक्यात आणली. आग लागलेल्या मागेच पर्वती दर्शन वसाहत भाग असून आग पसरली असती तर मोठी दुर्घटना घडली असती.