पुणे – केंद्र आणि राज्य शासनाच्या धर्तीवर शहरातील लॉकडाऊनही तीन टप्प्यांत शिथिल केले जाणार आहे. त्यानुसार, शहरात आता खासगी कार्यालयेही 10 टक्के कामगार उपस्थित ठेवून सुरू करता येईल. तर, मॉल्सवगळता इतर सर्व प्रकारची दुकाने पी1 आणि पी2 पद्धतीने उघडता येणार आहेत. त्यात प्रामुख्याने मुख्य रस्ता पूर्व-पश्चिम असल्यास दक्षिण बाजूची दुकाने सम तारखेस तर उत्तर बाजूची दुकाने विषम तारखेस उघडता येणार आहेत. तर मुख्य रस्ता दक्षिण उत्तर असल्यास सम तारखेस पूर्व बाजूची दुकाने तर विषम तारखेस पश्चिम बाजूची दुकाने उघडता येणार आहेत. तीन टप्प्यात पुणे शहरातील लॉकडाऊन पूर्णपणे खुले करण्यात येणार आहे.
असे शिथिल होणार लॉकडाऊन
दि. 3 जून
– व्यायामांसाठी खासगी व सार्वजनिक मैदाने. पहाटे 5 ते सायं. 7 पर्यंत.
– प्लंबर, विद्युततंत्री, पेस्ट कंट्रोल तसेच आणि अन्य तांत्रिक व्यवसायिक.
दि. 5 जून
– मॉल वगळता सर्व व्यापारी क्षेत्रे, रस्त्यावरील दुकाने पी-1, पी-2 पद्धतीने.
– मंडईतील सम क्रमांकाचे गाळे सम दिनांकास, तर विषम क्रमांकाचे गाळे विषम दिनांकास खुले.
– कपड्यांच्या दुकानांना ट्रायलरुमवर बंदी, विक्री केलेले कपडे बदलून अथवा परत करता येणार नाही.
8 जून
– खासगी कार्यालयांमध्ये 10% उपस्थिती. घरी जाताना विशेष काळजी. कर्मचाऱ्यांचे जनजागृती मार्गदर्शन अनिवार्य.