कवठे -लॉकडाउनच्या काळात पुणे, मुंबईतून शिरगाव (ता. वाई) येथे आलेल्या चाकरमान्यांनी श्रमदानाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा परिसर स्वच्छ केला. त्यामुळे शाळेचे रूपडे पालटले आहे. या लोकांनी क्वारंटाइनच्या काळातही आगळावेगळ्या पद्धतीने आनंद लुटला. मुंबई, पुणे व इतर शहरांमधून अनेक जण शिरगावात आले आहेत. आपत्ती व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायतीने या लोकांची व्यवस्था जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत केली आहे. या शाळेत 28 जण क्वारंटाइन होते. त्यांचे सुरुवातीचे दोन-चार दिवस हे सगळं माझ्याच वाट्याला का, या विचारात गेले; पण जसजशी लोकांची संख्या वाढली, तसे त्यांच्या लक्षात आले की, ज्यांना आपण कधीच पहिले नव्हते, ते एकत्र आले आहेत. त्यातून गप्पा, गोष्टीतून विचारांचे आदानप्रदान सुरू झाले. त्यातूनच रिकाम्या वेळेत शाळेची स्वच्छता व सुशोभिकरण करायचे ठरले. सर्वांनी मिळून मैदानाची स्वच्छता करून पालापाचोळ्याची विल्हेवाट लावली. बागकामात झाडांना आळी केली. झाडांना पाणी दिले गेले. त्यातून शाळेचे रूपडे पालटलं. चाकरमान्यांच्या या कामाचे ग्रामस्थांनी कौतुक केले.