महावितरणाच्या निष्काळजीपणाने जाताहेत जीव

तुटलेल्या वीज वाहिन्यांचा शॉक
लागून गाय, श्‍वानाचा मृत्यू, गुराखी जखमी

वडगाव मावळ – कान्हे फाटा येथे तुटलेल्या वीज वाहिन्यांचा शॉक लागून गाय व कुत्र्याचा जागीच मृत्यू झाला तर गुराखी गंभीर जखमी झाला आहे. ही घटना गुरुवार (दि.1) सकाळी साडे नऊ वाजता किशोर पंढरीनाथ सातकर यांच्या घराजवळ, आमदार पडाळ, कान्हे फाटा येथे घडली. महावितरणचे अधिकारी मात्र सायंकाळी चार वाजता पंचनामा करण्यासाठी आले. मावळात सुरू असलेल्या संततधार व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे गुरुवारी (दि.1) सकाळी साडेनऊ वा. तीन अतिजीर्ण विद्युत वाहिन्या तुटून खाली पडल्या.

नेहमीप्रमाणे जनावरे चरत होती, एका सहा वर्षांच्या गायीला त्या विद्युत वाहिनीचा शॉक लागून मृत्यू झाला. त्याच विद्युत वाहिनीचा शॉक कुत्र्याला लागून त्याचाही मृत्यु झाला. वसंत विराप्पा चिलाळे (वय 50, रा. कान्हे ता.मावळ) हे गाय खाली का पडली पाहण्यासाठी जवळ गेला असता, त्याला त्या विद्युत वाहिनीचा शॉक लागून दूर फेकले गेले. त्यातच ते गंभीर जखमी झाले आहेत. त्याचवेळी किशोर पंढरीनाथ सातकर, अमोल पंढरीनाथ सातकर व रामदास दशरथ सातकर यांनी वेळीच शासकीय ग्रामीण रुग्णालय कान्हे फाटा येथे वैद्यकीय उपचारासाठी दाखल केल्याने जीव वाचला. सकाळी 9:30 वा. घटना घडली असता, घटनास्थळी कनिष्ठ अभियंता श्‍याम दिवटे सायंकाळी चार वाजता आले .

15 जुलै 2019 रोजी महावितरण कंपनी वडगाव ता. मावळ यांच्या कार्यलयाच्या वतीने अतिजीर्ण व धोकादायक झालेल्या विद्युत खांब बदलण्यात आला. पण त्या खांबासोबत अतिजीर्ण झालेल्या विद्युत वाहिन्या पुन्हा तशाच बसविण्यात आल्या. अनेक वेळा किशोर पंढरीनाथ सातकर यांनी महावितरण कार्यालयाकडे अतिजीर्ण विद्युत वाहिन्यांपासून जीवितहानी होण्याची शक्‍यता वर्तविली होती. आमदार पडाळ परिसरात विद्युत वाहिन्या झाडामध्ये गुंतल्या व घराच्या छताला चिकटल्या आहेत. विद्युत खांब व वाहिन्याबाबत वारंवार तक्रार करूनही महावितरणकडून काहीही कारवाई होत नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.