25 दशलक्ष लिटर सांडपाणी वाढले

पिंपरी – सध्या पावसाळा सुरू असल्याने शहरात दररोज निर्माण होणाऱ्या सांडपाण्यात 25 दशलक्ष लिटरने वाढ झाली आहे. त्यामुळे मैलाशुद्धीकरण केंद्रामध्ये संबंधित सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी अतिरिक्‍त ताण पडत आहे. त्याशिवाय, पवना धरणातून शहरासाठी महापालिकेकडून उचलत असलेल्या पिण्याच्या पाण्यातील गढूळपणा कमी करण्यासाठी पॉली ऍल्युमिनियम क्‍लोराईडचा अतिरिक्‍त डोस द्यावा लागत आहे.

शहरात दररोज 312 दशलक्ष लिटर इतके प्रतिदिन सांडपाणी तयार होते. सध्या पाऊस सुरू असल्याने सरासरी 25 दशलक्ष लिटर इतके जादा सांडपाणी तयार होत आहे. महापालिकेकडून सध्या 13 मैलाशुद्धीकरण केंद्राच्या माध्यमातुन प्रतिदिन 265 दशलक्ष लिटर इतक्‍या सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. तर, तब्बल 47 दशलक्ष लिटर इतके सांडपाणी विनाप्रक्रिया नदीपात्रात सोडले जात आहे. सध्या 265 दशलक्ष लिटर व्यतिरिक्‍त 25 दशलक्ष लिटर इतक्‍या जादा सांडपाण्यावर मैलाशुद्धीकरण केंद्रांमध्ये प्रक्रिया करावी लागत आहे. पर्यायाने, संबंधित केंद्रांवर त्याचा अतिरिक्‍त भार पडत आहे.

पाणी शुद्ध करण्यासाठी 45 मेट्रिक टन पावडर
पावसाळ्यात गढूळ होणारे पवना नदीचे पाणी शुद्ध करून शहरासाठी पुरविताना त्यामध्ये पॉली ऍल्युमिनियम क्‍लोराईड मिसळून त्याचा गढूळपणा कमी करावा लागतो. पेठ क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रातील प्रयोगशाळेत या पाण्याची चाचणी घेतली जाते. येथील जलशुद्धीकरण केंद्र फेज-1 ते फेज-4 मध्ये पाणी शुद्ध करण्यासाठी दररोज प्रति मिनिट 26 लिटर पॉली ऍल्युमिनियम क्‍लोराईड लिक्विड स्वरूपात पाण्यात मिसळावे लागत आहे. त्यासाठी दिवसभरात 40 ते 45 मेट्रिक टन इतकी पॉली ऍल्युमिनियम क्‍लोराईडची पावडर लागत आहे. त्याशिवाय, पाणी शुद्धीकरणासाठी वापरण्यात येणारे वाळूचे फिल्टर साफ करण्यासाठी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जादा पाणी लागते. सध्या त्यासाठी दररोज दोन ते अडीच लाख लिटर इतके पाणी लागत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.