-->

“नानाच्या नाना तऱ्हा !सकाळी आयसोलेशन आणि रात्री…”; भाजपच्या ‘या’ नेत्याची नाना पटोलेंवर सडकून टीका

मुंबई: आयसोलेशनमध्ये असतानाही जुहू येथील सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर भाजपने टीका केली आहे. सकाळी आयसोलेशन आणि रात्री सेलिब्रेशन. नानाच्या नाना तऱ्हा, असे म्हणत भाजपने काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

नाना पटोले यांनी त्यांच्या कुटुंबातील एकाला कोरोनाची लागण झाल्याने काही दिवस आयसोलेशनमध्ये राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, त्यानंतरही काल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त जुहू येथील आयोजित कार्यक्रमात भाग घेतला होता. नाना पटोले यांनी स्वत: ट्विट करून त्यांचा कार्यक्रमातील फोटोही शेअर केला होता. त्यावरून भाजप नेते प्रसाद लाड यांनी नाना पटोले यांच्यावर टीका करणासे ट्विट केले आहे.

नानाच्या नाना तऱ्हा!! ‘सकाळी आयसोलेशन अन् रात्री सेलिब्रेशन! हाच आहे काँग्रेसचा तमाशा… स्वतःचे कार्यक्रम जोशात साजरे करायचे आणि असेच छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरे करणाऱ्यांना १४४ कलम लावून अटक करायचं, अशी टीका करतानाच नानाजी मांजरा सारखं वागताय, डोळे मिटून सगळे नियम मोडताय!, असा टोलाही लाड यांनी लगावला आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढला आहे. मुंबईत नव्या रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. यामध्ये इमारतींना सील करण्यापासून अनेक गाईडलाईन्स जारी करण्यात आले आहेत. राज्यात कोरोनाचा वाढता आकडा पाहता या गाईडलाईन्स महत्त्वाच्या आहेत. अन्यथा गेलेले दिवस पुन्हा अनुभवायची नामुष्की मुंबईकरांवर ओढवेल. त्यामुळे या गाईडलाईन्स काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन महापालिका आयुक्तांकडून करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.