मुंबई – येत्या जून महिन्यात अपेक्षित असलेली विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढविण्याची घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज केली. सहा वर्षापूर्वी कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आता महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने लढवली होती.
आता या निवडणुकीत काँग्रेसने उमेदवार देण्याचे जाहीर केल्याने महाविकास आघाडीचे संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. विधान परिषदेत कोकण पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे भाजपाचे निरंजन डावखरे यांची मुदत 7 जुलै 2024 रोजी संपत आहे. त्यामुळे या जागेसाठी जून महिन्यात निवडणूक अपेक्षित आहे.
आता महाविकास आघाडीत काँग्रेसने कोकण पदवीधर मतदारसंघावर दावा केला आहे. नाना पटोले म्हणाले की, कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून काँग्रेस पक्षाचा उमेदवार उभा करावा यावर सर्व बाजूंनी विचार करण्यात आला.
कोकण विभागातून काँग्रेस पक्षाचा उमेदवार द्यावा अशी आग्रही मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. भारतीय जनता पक्षाच्या सरकारला जनता कंटाळलेली असून भाजपा महायुतीला घरी बसवण्याचा निर्णय जनतेने केला आहे, असेही नाना पटोले म्हणाले.