खबरदारीचा उपाय! खासगी रुग्णालयांचे ‘बेड’ पुन्हा पुणे पालिकेकडे

 आयुक्‍तांकडून रुग्णालयांना थेट सूचना

पुणे – करोनाच्या नवीन बाधितांचा आकडा दिवसाला 100 ने वाढत आहे. त्यामुळे महापालिकेची प्रशासकीय यंत्रणा पुन्हा सक्रिय झाली असून, बाधितांना उपचारांसाठी बेड्‌सची सुविधा वाढवण्यास महापालिकेकडून सुरूवात करण्यात आली आहे. त्यासाठी खासगी हॉस्पिटल्सचे बेड्‌स ताब्यात घेतले जाणार असून आयुक्त स्तरावरून खासगी रुग्णालयांना कोविडचे बेड तातडीनं वाढवण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. तसेच आवश्‍यकतेनुसार टप्प्याटप्प्याने हे बेड वाढवण्याबाबतही सर्तक राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ऑक्‍टोबर 2021 नंतर शहरात करोनाची साथ मंदावली होती. त्यामुळे दैनंदिन नव्याने आढळणाऱ्या रुग्णांचा आकडा दीडशेपर्यंत खाली आला होता. करोनाची साथ मागील वर्षी मोठ्या प्रमाणात पसरलेली असताना खासगी रुग्णालयाचे ताब्यात घेतलेले बेड इतर रुग्णांना वापरण्यास मुभा देण्यास महापालिका प्रशासनाने सुरूवात केली होती.

तसेच, शहरात पुन्हा करोनाची साथ वाढल्यास हे बेड 24 तासांच्या आत महापालिकेसाठी पुन्हा उपलब्ध करून देण्याचे हमीपत्रही या खासगी हॉस्पिटलकडून घेण्यात आलेले होते. मात्र, मागील दहा दिवसांपासून शहरात पुन्हा नव्याने बाधित होणाऱ्या रूग्णांचा आकडा लक्षणीय प्रमाणात वाढण्यास सुरूवात झाली आहे.

दररोज होणाऱ्या तपासण्यांच्या तुलनेत रुग्ण निष्पन्न होण्याचे प्रमाण (पॉझिटीव्हीटी रेट) 12 टक्‍क्‍यांच्या पुढे गेला आहे. यामुळे चिंता वाढली आहे. सक्रीय बाधितांचा आकडा 2 हजारांपर्यंत गेला असून हा आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे रुग्णवाढ झपाट्याने झाल्यास बेडची संख्या कमी पडू नये, या उद्देशाने महापालिकेकडून आतापासूनच खबरदारीचा उपाय म्हणून पुन्हा खासगी हॉस्पिटलला बेड सज्ज ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

600 ऑक्‍सिजन बेड महापालिकेकडे तयार
शहरात करोनाच्या नवीन बाधितांचा आकडा वाढत असतानाच, महापालिकेकडे सुमारे 600 ऑक्‍सिजन बेड तयार आहेत. यात, बाणेर कोविड केअर सेंटर 350, डॉ. नायडू रुग्णालय 120,लायगुडे दवाखाना 50, खेडेकर दवाखाना 50 बेड तयार आहेत. या शिवाय, गरज पडल्यास महापालिकेच्या जागेतील कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू करण्याचे नियोजन आहे. याशिवाय सीओईपी मैदानावरील जम्बो कोविड सेंटरही पुन्हा सुरू केले जाण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.