पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – घरच्या भांडणाला कंटाळून दोन मुलांसह माहेरी राहणाऱ्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्यावर कोयता आणि चाकूने तब्बल ३७ वार करत खून करणाऱ्या पतीला न्यायालयाने जन्मठेप आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास सहा महिन्यांचा अतिरिक्त साधा कारावास भोगावा लागेल, असे अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. पी. क्षीरसागर यांनी निकालपत्रात नमूद केले आहे.
भालचंद्र गिराप्पा सुर्वे (वय ३७, रा. आचेगाव, ता. दक्षिण सोलापूर) असे शिक्षा झालेल्या पतीचे नाव आहे. त्याला पत्नी अर्चना (वय २८) हिचा खून केल्याप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरविले आहे. याबाबत अर्चना यांचे वडील दत्ता बागडे (वय ५४, रा. उरुळी देवाची) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना २८ जुलै २०१९ रोजी सकाळी अकराच्या सुमारास उरुळी देवाची येथील अशोक नगरमध्ये घडली होती.
अर्चनाचे भालचंद्रसोबत २००८ मध्ये लग्न झाले. त्यांना दोन मुलेही झाली. परंतु, त्यांच्यामध्ये कायम भांडणे व्हायची. त्याला कंटाळून अर्चना दोन मुलांसह जानेवारी २०१८ मध्ये उरुळी देवाची येथे पालकांकडे राहायला आली. घटनेच्या दिवशी अर्चना एकटीच घरी असताना भालचंद्र आला आणि त्याने ३७ वार करून पोबारा केला. सहायक निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांनी भालचंद्रविरोधात खुनासह शस्त्रास्त्र कायद्याच्या कलमांनुसार आरोपपत्र दाखल केले.
भाऊ, शेजाऱ्याची साक्ष ठरली महत्त्वाची
अतिरिक्त सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी या खटल्यात सरकार पक्षाची बाजू मांडली. त्यांनी बारा साक्षीदार तपासले. निरीक्षक शशिकांत चव्हाण, हवालदार ललिता कानवडे आणि शिपाई माणिक गळाकाटे यांनी न्यायालयीन कामकाजात मदत केली.