पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – रेबीज हा जीवघेणा आजार आहे. एखाद्या व्यक्तीला रेबीज झाला, की हमखास मृत्यू हाेताे किंवा त्याला तो द्यावा लागतो. त्याला प्रतिबंध म्हणून केंद्र सरकारच्या निर्देशानुसार महापालिकेच्या आराेग्य विभागाने रेबीज फ्री पुणे करण्यासाठी पावले उचलली असून, येत्या काही दिवसांत शहरातील एक लाख ८० हजार भटक्या कुत्र्यांना रेबीज लसीचा डाेस देण्यात येणार आहे. त्यासाठी पशुवैद्यकीय विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.
रेबीज हा व्हायरस असून, ताे प्रामुख्याने प्राण्यांमध्ये आणि तेही खासकरून श्वानांमध्ये असताे. त्यांच्या चाव्यापासूनच तो माणसालाही हाेताे. ताे माणसाच्या शरीरात शिरल्यानंतर मज्जासंस्थेवर (सेंट्रल नर्व्हस सिस्टमवर) परिणाम करतो. तेथून ताे मेंदूपर्यंत पाेचताे आणि त्यामुळे रुग्णाचा मृत्यू निश्चित हाेताे.
हा मृत्यू भयानक असताे. अनेकदा रेबीज झालेल्या व्यक्तीला मृत्यू द्यावाही लागतो. त्यामुळेच रेबीज हाेऊच नये, यासाठी केंद्र सरकारने पावले उचलली आहेत. संपूर्ण देशातच भटक्या श्वानांचे लसीकरण करण्याची माेहीम आखली असून, त्यात पुण्याचाही समावेश आहे.
या लसीकरणामुळे श्वानांमध्ये रेबीजची लागण हाेत नाही आणि त्यांच्यापासून माणसांनाही हाेत नाही. म्हणून हे लसीकरण महत्त्वाचे आणि गरजेचे आहे. पुण्यात भटक्या श्वानांची संख्या प्रचंड आहे. त्यांची उत्पत्ती वाढू नये, यासाठी नियुक्त केलेल्या संस्थांकडून या भटक्या नर किंवा मादी कुत्र्यांना पकडून त्यांची नसबंदी करण्यात येते. त्यासाेबत त्यांना रेबीजचा डाेस देखील देण्यात येताे; परंतु आता सर्वच श्वानांना पकडून तेथेच लसीकरण केले जाणार असल्याची माहिती पशुवैद्यकीय विभागाच्या प्रमुख डाॅ. सारिका फुंडे यांनी दिली.
पुणे रेबीज फ्री करण्यासाठी हे लसीकरण करण्यात येणार आहे. शहरात कुत्र्यांना पकडण्यासाठी आणि नसबंदीसाठी आराेग्य विभागाने पाच संस्थांची नियुक्ती केली आहे. त्या संस्थांमार्फतच कुत्र्यांना पकडून तेथेच रेबीजचा डाेस देण्यात येईल. डोस दिल्याची खूणही करण्यात येईल. हे लसीकरण प्रत्येक वर्षी करण्यात येईल. येत्या काही दिवसांत त्यासाठी संस्थेला निविदा देण्यात येईल.- डाॅ. सारिका फुंडे पशुवैद्यकीय विभाग प्रमुख, पुणे महापालिका
श्वानांचा चावा, रेबीजमुळे झालेले मृत्यू २०२३
पुणे – ३३ हजार ११७, मृत्यू – १०
महाराष्ट्र – ०८ लाख ०९ हजार, मृत्यू – ३०