पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मनसेचा महायुतीत प्रवेश निश्चित झालेला असला, तरी अद्याप मनसेच्या कार्यकर्त्यांना महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात अथवा बैठकांमध्ये जाण्याचे कोणतेही आदेश नाहीत. त्यामुळे मनसे अद्याप महायुतीपासून चार हात दूरच असल्याचे चित्र आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा गुढीपाडव्याला मुंबईत मेळावा होणार असून, या मेळाव्यानंतरच मनसेची दिशा स्पष्ट होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे, कार्यकर्तेही या मेळाव्याच्याच तयारीत आहेत. लोकसभा निवडणुकीत मनसे महायुतीत जाणार असल्याची चर्चा आधीपासूनच होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आधी भाजपचे नेते अमित शहा आणि नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
या भेटीनंतर मनसे महायुतीत येणार असल्याचे स्पष्ट झाले असले, तरी त्या पक्षाला किती जागा मिळणार आणि कोणाच्या कोट्यातून ते लढणार हे अद्याप निश्चित झालेले नाही.
त्यामुळे मनसे कार्यकर्ते पुण्यातही वेट अॅन्ड वाॅचच्या भूमिकेत आहेत. आगामी मेळाव्यात राज ठाकरे आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यामुळे, त्यानंतरच मनसे महायुतीच्या प्रचारात सक्रीय होणार असल्याचे स्थानिक नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.