पुणे – बारामती लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांत बारामती शहराचे विकासाचे मॉडेल पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांनी दिली. तसेच विरोधात कोणी तरी असणारच आहे, शेवटी निवडणूक आहे. लोकांच्या आग्रहामुळेच आपल्याला उमेदवारी मिळाली असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.
बारामती लोकसभा मतदारसंघातील जनसामान्यांचा प्रचंड प्रतिसाद, बारामतीचे व्हिजन, विकासाचे मॉडेल, औद्योगिक विस्तार आदींवर सुनेत्रा पवार यांनी भाष्य केले. दैनिक प्रभातच्या पुणे येथील मुख्यालयाला त्यांनी आज भेट दिल्यानंतर अनौपचारिक संवाद साधत विकासाच्या विविध मुद्द्यांवर आपली संकल्पना मांडली.
दैनिक प्रभातचे सरव्यवस्थापक बी. एल. स्वामी यांनी सुनेत्रा पवार यांचे स्वागत केले. यावेळी कार्यकारी संपादक अविनाश भट, जाहिरात व्यवस्थापक प्रवीण पारखी, व्यवस्थापक रवी इंडी आदी उपस्थित होते.
सुनेत्रा पवार म्हणाल्या की, बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही निवडणूक आहे. कोणीतरी विरोधात असणारच आहे. निवडणुकीसारखी निवडणूक मी समजते. नागरिकांकडून मला उमेदवारी मिळाली आहे. सध्या मतदारसंघात प्रचंड उत्साह आहे. मतदारांकडून स्वागत केले जात आहे. संपूर्ण मतदारसंघात सकारात्मक वातावरण आहे.
त्यामुळे मला बळ मिळाले आहे. अजित पवार हे राज्यासाठी काम करीत आहेत. त्यांचे मार्गदर्शन मिळत आहे. त्यांच्याकडून राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन मिळत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत उत्साह दिसून येत आहे, असे त्यांनी यावेळी आवर्जून नमदू केले. दुष्काळ निवारणाच्या संदर्भात बोलताना काही भागात दुष्काळी स्थिती आहे. राज्य सरकार त्यावर काम करीत आहेत. केंद्र सरकारच्या ज्या योजना असतील त्या बारामती लोकसभा मतदारसंघात पोहोचवू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
लक्षवेधी कामगिरी
सुनेत्रा पवार या गेली पंधरा वर्षे सामाजिक, शैक्षणिक तसेच पर्यावरण, क्रीडा क्षेत्रात कार्यरत आहेत. संघटनात्मक कामात त्यांचा सहभाग लक्षवेधी आहे. बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या त्या अध्यक्षा आहेत. बारामती टेक्स्टाईल पार्कच्या माध्यमातून हजारो महिलांच्या हातांना त्यांनी काम मिळवून दिले आहे. एन्व्हॉर्यन्मेंटल फोरम ऑफ इंडियाच्या त्या अध्यक्षा आहेत. पर्यावरणविषयक चळवळ व जनजागृती त्यांनी केली आहे. फोरमच्या माध्यमातून हजारो युवक त्यांच्याशी जोडले गेले आहेत.
विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलाच्या त्या विश्वस्त आहेत. कै. रघुनाथ गेनबा बोरावके चॅरिटेबल ट्रस्टच्याही त्या विश्वस्त आहेत. महाराष्ट्र स्टेट ॲग्री अँड रुरल टुरिझम फेडरेशन (मार्ट) त्या संस्थापक अध्यक्षा आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट सदस्या म्हणून काम त्यांनी पाहिले होते.
बारामती तालुका बॅडमिंटन असोसिएशनच्या अध्यक्षा आहेत. कृषी उद्योग मूल शिक्षण संस्थेच्या विश्वस्त म्हणून त्या काम पाहत आहेत. अशा विविधांगी क्षेत्रातील त्यांच्या कामाचा अनुभव लोकसभा मतदार संघाच्या विकासाला निश्चितच उपयुक्त ठरेल असा विश्वास त्यांना वाटतो आहे.
सहा विधानसभा मतदारसंघात प्रतिसाद
उमेदवारी जाहीर होण्याच्या अगोदरच सुनेत्रा पवार यांनी मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरूवात केली. बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, भोर, वेल्हे, मुळशी तालुक्यांत प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केली आहे. यावेळी त्यांनी शेतकरी, सर्वसामान्य मतदार, कष्टकरी, महिला, युवक- युवती, विक्रेते आदी घटकांतील सर्वसामान्यांशी संवाद साधला. सर्वच ठिकाणी आपल्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे व मतदारांच्या अपेक्षा आणि समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
घटक पक्षांतील पदाधिकारी, कार्यकर्ते सक्रिय
महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार), शिवसेना (शिंदे गट), रिपाइं आदी पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे पाठबळ त्यांना मिळाले आहे. एकदिलाने सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते झटत असून पदयात्रा आणि बैठकांनाही सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.