सातारा – राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी गुरुवारी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. ऐतिहासिक पोवई नाका परिसरात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्या व्यतिरिक्त अन्य कोणतेही स्मारक असू नये असा आग्रह राजमातांनी धरला. त्यावर शिवप्रेमींच्या भावना लक्षात घेऊनच संबंधित आयलॅंडच्या प्रस्तावाचा विचार केला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याची माहिती आहे.
ऐतिहासिक पोवई नाका परिसरात लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या नावाने आयलॅंड उभारण्याचे प्रस्तावित आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासमवेत होणाऱ्या बैठकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्वतः पालकमंत्री शंभूराज देसाई आहेत. या बैठकीच्या शक्यतेने राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याशी अर्धा तास चर्चा केली. खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशीही राजमातांनी चर्चा केल्याची माहिती आहे.
ऐतिहासिक पोवई नाक्याचे महत्त्व राजमातांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितले. शिवरायांच्या आगळ्या वेगळ्या पुतळ्याचे त्यांनी वैशिष्ट्ये सांगितले. या क्षेत्राला आता शिवतीर्थ म्हणून अलिकडेच मान्यता देण्यात आली आहे. येथेच आयलॅंड उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. या निर्णयाला सातारकरांनी तीव्र विरोध केला आहे.
कोणत्याही कर्तृत्ववान राजाच्या व्यतिरिक्त या परिसरात कोणाचे पुतळे स्मारक उभे होऊ देणार नाही, तसा प्रयत्न झाला तर जनक्षोभ उसळेल अशी माहिती राजमाता कल्पनाराजे यांनी देतानाच लोक भावनेचा विचार व्हावा, असा आग्रहही धरला. दरम्यान, शिवप्रेमींची भावना, लोक भावना विचारात घेऊनच पोवई नाक्यावरील निर्णय होईल. यासंदर्भात आपण स्वतः सर्व संबंधितांशी बोलून चर्चा करू अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी दिली.